ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांनी देशाची राजकीय स्थिती यामध्ये हैदराबाद संस्थानातील मराठवाडा समजून घेऊन या भागाचा इतिहास, सामाजिक, राजकीय वास्तव यावर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला. त्यांनी वृत्तपत्रातूनही दीर्घकाळ स्तंभलेखन लेखन केले आहे. तसेच त्यांनी साहित्यिक क्षेत्रातही दीर्घकाळ मुशाफिरी केली आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित देखील करण्यात आल होत.
चपळगावकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. तसंच ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’ या पुस्तकासाठी भैरुरतन दमाणी पुरस्कार, आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
चपळगावकर यांनी आपल्या न्यायालयीन कारकीर्दीत १९६२ ते १९७८ दरम्यान बीड येथे वकिली केली. त्यानंतर १९८१ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्यायाधीश म्हणून योगदान दिले. १९९९ मध्ये निवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक, वैचारिक, आणि साहित्यिक क्षेत्रांत आपले काम सुरू ठेवले. त्यांनी न्याय, मानवाधिकार आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक लेख लिहिले.