शरद पवार साहेब, आपण यूपीए सरकारच्या दोन्ही पंचवार्षिक काळात तब्बल दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री होतात. त्यावेळी सहकार खातं हा कृषी खात्याचाच एक भाग होता. त्यावेळी आपण आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी, सहकारासाठी काय योगदान दिले? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर नाशिक येथे निशाणा साधला.
काल म्हणजेच शुक्रवारी (दि.२४) जानेवारी रोजी नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील शेतकऱ्यांसाठी उभारण्यात आलेले माती परीक्षण केंद्र आणि अगरबत्ती कारखान्याचे उद्घाटन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाले. यावेळी अजंग येथील ‘व्यंकटेशा फॉर्म’ येथील सभेला संबोधित करताना त्यांनी पवारांवर जोरदार टोलेबाजी करतं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी अमित शहा यांनी पवारांवर तुफान टोलेबाजी केली. मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे आहे, पण कोणतेही काम हे जमिनीवर राहून केले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांचा ४६ हजार कोटी रुपयांचा कर कमी करण्याचं काम आमच्या सरकारने केलाय आणि आमच्या अशा अनेक योजना यापुढे देखील येत राहतील असंही ते पुढे म्हणाले.
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’चा नारा दिला होता, तर विकास पुरुष असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान’चा नारा दिला. सहकार आणि विज्ञान यांची सांगड घातली, तर शेती निश्चित फायदेशीर ठरते. मोदींनी माती परीक्षणाला सुरुवात केली, तेव्हा मातीत कोणती पिके घ्यावी आणि कोणती घेऊ नयेत, हे शेतकऱ्यांना समजले. पाण्यात क्षार किती प्रमाणात आहेत, पिकाला सल्फर टाकायचे की नाही, आपल्या जमिनीचा पोत ठरवून कोणते पीक घ्यावे, याची माहिती माती परीक्षण केल्याने मिळते. लॅब तुम्ही बनवली, पण ऑर्गेनिक परीक्षण लॅब बनवा. भारत सरकारकडून तुम्हाला सर्वतोपरी मदत मिळेल. ऑर्गेनिक कॉर्पोरेट स्थापन करून पिकवलेला शेतीमाल विक्री करून जो पैसा येणार आहे, तो शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे. ऑर्गेनिक प्रमाणपत्र असणारी उत्पादने तयार करण्यावर भर द्यावा, असे आवाहन अमित शाह यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. जवान आणि किसान हे दोघेच ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता भारतमातेची सेवा करतात, असेही ते म्हणाले.