धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाड्याचा हा जिद्दी आणि ध्येयवेडे सामाजिक कार्यकर्ते चैतराम पवार यांचा शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरव केला आहे, आणि यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
1990 पासून कोणत्याही मानमरातबांना न जुमानता, साध्या राहणीसह समाजसेवेच्या वाटेवर अविरत कार्य करणारा हा अनुसूचित जमातीतील तरुण आज समस्त देशासाठी आदर्श ठरला आहे. आपल्या गावातील ओसाड जमिनींना हिरवाई दिली, शिक्षण थांबलेल्या शाळा पुन्हा सुरू केल्या, जलसंधारण, जैव विविधतेचा अभ्यास व संरक्षण, महिला सक्षमीकरण व लोकसहभागातून शाश्वत विकास साधत त्यांनी केवळ बारीपाड्याचाच नाही, तर संपूर्ण तालुका आणि जिल्ह्याच्या विकासाला प्रेरणा व गती दिली.
एका एम.कॉम. शिक्षित तरुणाने पुण्यातील बँकेच्या नोकरीचे पक्के आश्वासन नाकारून आपल्या गावासाठी झोकून देण्याचा घेतलेला निर्णय आज देशाच्या नवनिर्माणाचा एक उज्ज्वल अध्याय ठरला आहे. “अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे” खंदे कार्यकर्ते असलेल्या पवार यांनी सामूहिक प्रयत्नांतून बारीपाड्याला देश-विदेशात आदर्श ग्राम विकासाचे प्रतीक बनवले आहे.
आजही साध्या कपड्यांमध्ये वावरणारे आणि गळ्यात पडणाऱ्या मान-सन्मानांना निर्मोहीपणे दूर सारणारे चैतराम पवार यांचे कार्य हे पद्मश्री पुरस्काराने अधिक तेजस्वी झाले आहे. हा सन्मान केवळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा नाही तर त्यांच्या कार्याला हातभार लावणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांचाही आहे. चैतराम पवार यांचे योगदान सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”