Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या लाडकी बहीण योजनेला राज्यातील बहिणीकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षी सुरु केलेली ही काही दिवसातच लोकप्रिय झाली. राज्य सरकारच्या या योजनेद्वारे राज्यातील बहिणींना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी दरमहा 1500 रुपये दर महिन्याला दिले जातात. आणि लवकरच ही रक्कम वाढून 2100 रुपये केली जाणार आहे. मात्र, आता नुकत्याच आलेल्या एका निर्णयामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसू शकतो.
माहितीनुसार, अनेक अपात्र महिला या योजेनचा लाभ घेत असून, त्यांचावर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या सरकारकडून अर्जांची छाननी सुरू झाली आहे. यात एखादी महिला अपात्र आढळ्यास त्या महिलेकडून आधी मिळालेली रक्कम परत घेतली जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी निकषात बसत नसलेल्या अनेक महिलांनी अर्ज केला होता. पूर्वी सरसकट सर्व महिलांना लाभ दिला जात होता. मात्र आता अर्जाची छाननी करून निकषात बसत नसलेल्या महिलांचा अर्ज बाद केला आहे. तसंच त्या महिलांना आतापर्यंत मिळालेले पैसे परत घेतले जाणार आहेत. मात्र या योजनेअंतर्गत मिळालेले पैसे सक्तीने परत घेतले जाणार का? याबाबत अनेक चर्चा उठल्या होत्या. त्यावरच आता महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण देताना सांगण्यात आले, ‘निवडणुकीच्या काळात महिलांना सरसकट या योजनेंतर्गत पैसे देण्यात आले. मात्र, अनेक अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आतापर्यंत देण्यात आलेल्या पैशांचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सरकार दिलेले पैसे परत घेणार यामुळे अनेक महिला योजनेतून बाहेर पडत आहेत. मात्र, सरकारने रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती करण्यात येत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी याबाबत सांगितले की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत’
या योजनेमध्ये काही लाभार्थी महिला लाडक्या बहिणीच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसंच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केल आहे.