Donald Trump: अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक धडाकेबाज निर्णय घेत आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच दिवशी अनेक कार्यकारी आदेशांवर सह्या केल्या होता. दरम्यान, आता त्यांनी इस्त्राईलप्रमाणे ‘आयर्न डोम’ प्रणालीची निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्प यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांना शक्य तितक्या लवकर देशात आयर्न डोम प्रणाली तयार करण्याचे आदेश दिले आहेत. खरं तर ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या आश्वासनांपैकी एक ‘आयर्न डोम’ प्रणाली तयार करणे आहे. त्यांनी गेल्या वर्षी मिलवाकी येथे रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात त्यांनी म्हटले होते की, जर त्यांनी निवडणूक जिंकली तर देशाच्या सुरक्षेसाठी ते इस्त्राईलप्रमाणे आयर्न डोम प्रणालीची निर्मिती करतील.
आयर्न डोम प्रणाली काय आहे?
2011 मध्ये इस्त्राईलने आपल्या देशात या आयर्न डोमची निर्मिती केली होती. ही इस्राईलमधील सर्वात शक्तिशाली शस्त्र प्रणाली आहे. ही हवाई संरक्षण प्रणाली इस्राईलच्या लोकांना हवाई हल्ल्यापासून संरक्षण देते. जर आयर्न डोमच्या दिशेने 100 रॉकेट्स येत असतील तर 90 रॉकेट हवेतच नष्ट करण्याची क्षमता या आयर्न डोम प्रणालीमध्ये आहे. ही एक अँटी मिसाइल सुरक्षा प्रणाली आहे.
ही प्रणाली म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच आहे. हवेतून येणाऱ्या मिसाईल्सना हवेतच उद्धवस्त करण्याची क्षमता यामध्ये आहे. रॉकेट, मोर्टर, टॉप शेल अशा कोणत्याही हल्ल्याला हवेतच नष्ट करण्याची यात क्षमता आहे. देशाच्या चारही बाजूंनी, विविध ठिकाणी ही प्रणाली तैनात करण्यात आलेली आहे.
इस्राईलच्या सीमेवर कोणतीही मिसाईल, ड्रोन वा हल्ला करणारी एखादी गोष्ट येते तेव्हा आयर्न डोम सिस्टीम आपोआप सुरू होते आणि हवेतून येणाऱ्या गोष्टी हवेतच नष्ट करून टाकते.