परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सध्या दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. चीनच्या दौऱ्यावर त्यांनी दोन्ही देशांच्या महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेतला. परराष्ट्र सचिव आणि चिनी उप-परराष्ट्रमंत्री यांच्यात संवाद साधण्यासाठी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला व भविष्यात संबंध दृढ करण्यासाठी काही आवश्यक पावल उचलण्यात आली. यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने माहिती देताना सांगितले, “गेल्या वर्षी रशियातील काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीपासून दोन्ही देशांमध्ये बरीच सहमती झाली आहे. यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये सक्रिय चर्चा झाली. तसेच सर्वच पातळ्यांवर संबंध सुधारण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
याचदरम्यान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन्ही देशांनी यावर्षी उन्हाळ्यात कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यमान कराराअंतर्गत आवश्यक व्यवस्थेबद्दल चर्चा केली जाईल. याव्यतिरिक्त, भारत आणि चीन यांनी हवामान डेटाची देवाणघेवाण आणि सीमा नद्यांच्या इतर सहकार्यासाठी दोन्ही देशांमधील तज्ञ पातळीवरील यंत्रणेची प्रारंभिक बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे.
तसंच लोकांच्या परस्पर संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन्ही देशांनी माध्यम आणि कल्पना मंचांच्या वाटाघाटीस प्रोत्साहित करण्याचे नियोजन केले आहे. यासह, दोन्ही देशांमधील थेट हवाई सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यासाठी, दोन्ही देशांचे तांत्रिक अधिकारी बैठक घेतील आणि नवीन योजना तयार करतील.
मानसरोवर यात्रा का थांबवण्यात आली होती?
2020 पासून भारत आणि चीनमधील संबंध तणावपूर्ण बनले होते. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांदरम्यान लष्करी संघर्ष झाला होता, ज्यामध्ये दोन्ही बाजूंचे नुकसान झाले. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. आणि दोन्ही देशांनी सीमेवर त्यांच्या सैनिकांची तैनात वाढविली होती, ज्यानंतर सर्व प्रकारचे संबंध तुटले होते. ज्यामुळे कैलास मानसरोवरचा प्रवास थांबला होता. भारत आणि चीन दरम्यान थेट उड्डाणांची सेवा देखील थांबविण्यात आली होती.
कैलास मानसरोवरचा बहुतांश भाग तिबेटमध्ये आहे. चीन तिबेटवर आपला हक्क सांगतो. कैलास मानसरोवरचा मोठा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यामुळे येथे जाण्यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे.