Guillain-Barre Syndrome : गुलेन बॅरी सिंड्रोमच्या (जीबीएस) वाढत्या प्रकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. पुणे, महाराष्ट्रानंतर आता काही राज्यांमध्येही या आजाराने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे आता इतर राज्यांमध्ये देखील चिंता वाढली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या महाराष्ट्रात या आजाराचे एकूण 127 रुग्ण आढळेल आहेत. तर यात सुमारे 20 रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. या आजारामुळे राज्यात एकाच मृत्यू झाल्याची देखील माहिती आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमच्या वाढत्या रुग्णांमुळे महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त केली आहे. अहवालानुसार, या आजारामुळे पुण्यात आणखी एक मृत्यू झाला झाला आहे. या आजारात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये ४० ते ५० वयाच्या लोकांचा समावेश आहे. दुसरीकडे पश्चिम बंगालमध्येही गुलेनबॅरी सिंड्रोममुळे तीन जणांनी आपला जीव गमावला आहे. परंतु अद्याप सरकारने याची पुष्टी केलेली नाही.
पश्चिम बंगाल, राजस्थान तसेच महाराष्ट्रात गुलेन बॅरी सिंड्रोमची प्रकरणे नोंदविली जात आहेत. गुलेन बॅरी सिंड्रोम या पसरत्या आजारामुळे पश्चिम बंगालमध्ये गेल्या चार दिवसांत तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, राज्य आरोग्य विभागाने अद्याप या मृत्यूच्या करणाबाबत अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. वरिष्ठ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालमधील परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असून, घाबरण्याची गरज नसल्याचं म्हंटल आहे. सध्या देशभरात या आजाराची रूग्णांची संख्या वाढत असल्याने वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे.
हा आजार कशामुळे पसरतोय?
गुलेन बॅरी सिंड्रोमची प्रकरणे अचानक का वाढत आहेत, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. महाराष्ट्र सध्या या आजाराने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री प्रकाश अबितकर यांचा असा विश्वास आहे की, पुण्यात हा आजार दूषित पाण्यामुळे पसरत आहे. मात्र, या आजाराचे मुख्य कारण अजूनही समोर आलेले नाही.
राज्यात पसरलेल्या या रोगाविषयी नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली आहे, ज्यात अधिकाऱ्यांचा देखील असा विश्वास आहे की दूषित पाण्यामुळे हा रोग बहुधा पसरत आहे. याचा सामना करण्यासाठी, एक टास्क फोर्स देखील तयार केली गेली आहे जी पाण्याच्या नमुन्याचे परीक्षण करून रोगाचा प्रसार थांबविण्याचे कार्य करीत आहे.