Union Budget 2025 : ‘मी सर्व देशवासीयांचं या ऐतिहासिक बजेट निमित्ताने अभिनंदन करतो. तसंच देशाच्या अर्थमंत्र्यांचं देखील अभिनंद करतो. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प प्रत्येक भारतीयाची स्वप्ने पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. भारताच्या विकासाच्या प्रवासातील आजचा दिवस महत्त्वाचा टप्पा आहे. हा 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. तरुणांसाठी आम्ही अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. हे विकसित भारताच्या मिशनला चालना देणार आहे, हे बजेट फोर्स मल्टीप्लायर आहे.
सामान्यत: अर्थसंकल्पात सरकारची तिजोरी कशी भरली जाईल यावरच लक्ष केंद्रित केले जाते, परंतु हा अर्थसंकल्प त्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. देशातील नागरिकांचे खिसे कसे भरले जातील, देशातील नागरिकांची बचत कशी वाढेल आणि देशातील नागरिक विकासाचे भागीदार कसे होतील, याचा अतिशय भक्कम पाया हा अर्थसंकल्प मांडतो. अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्प सादरीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण, उद्योग, शेतकरी, तरुण, महिला, आरोग्य अनेक क्षेत्रासाठी सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बजेट सादर केल्यानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. या बजेटचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे. खासकरून या बजेटमध्ये शेतकरी आणि नोकर वर्गासाठी सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत.