केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या तिसऱ्या टर्मचा आज पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण, उद्योग, शेतकरी, तरुण विभागात सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत.
तसंच बारा लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. याशिवाय उत्पन्नदरानुसार नवी कर प्रणाली कशी असेल याची देखील माहिती दिली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या 2025च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला नेमकं काय आलं? पाहूया…
अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं?
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एमयुटीपी-3 प्रकल्पासाठी 1465 कोटी 33 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. पुणे मेट्रोसाठी 837 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुळा मुठा नदी संवर्धनासाठी जायकांतर्गत 230 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी 4 हजार 3 कोटी, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे – प्रशिक्षण संस्थेसाठी 126 कोटी 60 लाख, मुंबई मेट्रोसाठी 1673 कोटी 41 लाख, महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी 683 कोटी 51 लाख, महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क-मॅग्नेट प्रकल्पासाठी 596 कोटी 57 लाख, ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी 186 कोटी 44 लाख, इंटीग्रेटेड ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी 652 कोटी 52 लाख, सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी 1094 कोटी 58 लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळाला आहे.
दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे आभार व्यक्त केले. तसेच देशात तयार होणारे कपडे, चामड्याच्या वस्तू, मत्स्योत्पदनांवरील शुल्क कमी झाल्याने महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यानी व्यक्त केला आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे ‘ड्रीम अर्थसंकल्प’ असं म्हंटलय.