अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी संसदेतील कामकाज विरोधकांच्या जोरदार गदारोळाने सुरू झाल्याचे दिसून आले. लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांच्या उपस्थितीत, विरोधी पक्षाचे खासदार महाकुंभात झालेल्या अपघातातील मृत्यूंवर चर्चा करण्याची मागणी करताना यावेळी दिसून आले. मात्र यावर ओम बिर्ला यांनी गोंधळ घालणाऱ्या विरोधकांना सांगितले की, जनतेने तुम्हाला इथे टेबल फोडण्यासाठी पाठवलेले नाही.तसेच राष्ट्रपतींनीही आपल्या भाषणात महाकुंभचा उल्लेख केला आहे. सध्या प्रश्नोत्तराचा तास आहे, त्यामुळे इतर कोणत्याही विषयावर यावेळी चर्चा करता येणार नाही. असेही बिर्ला यांनी त्यांना सुनावले.
खरे तर संसद अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे आज वक्फ विधेयकाचा अहवाल (जेपीसी) आज संसदेत सादर केला जाऊ शकतो असे सांगितले जात आहे.
संसदेचे कामकाज पुढे नेताना, विरोधी सदस्यांच्या मागणीनुसार प्रश्नोत्तराचा तास आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीची चर्चा करण्यासाठी एका सुरात घोषणाबाजी सुरू केली.
विरोधकांची मागणी काय आहे?
महाकुंभ चेंगराचेंगरीबाबत, विरोधी पक्षांकडून सतत असे म्हटले जात आहे की सरकार आकडे लपवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत, खासदार सरकारकडे मृतांची संपूर्ण यादी जाहीर करण्याची मागणी करत आहेत जेणेकरून कुठेही गोंधळ होणार नाही.
लोकसभेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, सभापती ओम बिर्ला विरोधी खासदारांना प्रश्नोत्तराच्या तासाचा पुरेपूर फायदा घेण्याचे आणि घोषणाबाजीची वृत्ती सोडून देण्याचे आवाहन करत असल्याचे दिसून आले . या प्रकारचे वर्तन संसदीय शिष्टाचाराला अनुरूप नाही.असेही विरोधकांना यावेळी सांगण्यात आले आहे.
29 जानेवारीला प्रयागराज महाकुंभमध्ये चेंगराचेंगरी झाली होती.यादरम्यान 30 मृत्यू आणि 60 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. आता या मुद्द्यावरून विरोधकांनी यूपीसह केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.