फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होताच हवामानातही बदल होताना दिसत आहेत. देशभरात गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाचा तडाका वाढत असल्याने थंडीचा प्रभाव कमी झाला होता. अशातच आता काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ४ फेब्रुवारीपासून पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने गाझियाबादसह 22 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी केला आहे. तसंच 6 फेब्रुवारीनंतर हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, जोरदार वाऱ्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे.
22 जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
हवामान खात्याने पश्चिम उत्तर प्रदेशातील 22 जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे. पावसासह धुके पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
थंडीत वाढ होण्याची शक्यता
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 6 फेब्रुवारीपासून राज्यात हवामान कोरडे राहणार असून, धुके कायम असणार आहेत. या काळात जोरदार वारे वाहण्याची शक्यता असून त्यामुळे तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज?
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर प्रदेशमध्ये नोएडा, गाझियाबाद, बुलंदशहर, बागपत, मेरठ, हापूर, मुरादाबाद, रामपूर, बिजनौर, अमरोहा आणि संभलसह अनेक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
याशिवाय मुझफ्फरनगर , शामली, सहारनपूर, बदाऊनी, बरेली, पिलीभीत, शाहजहांपुर, अलीगढ, हाथरस, मथुरा आणि आग्रा येथे हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याच वेळी, सहारनपूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, नोएडा, बुलंदशहर, संभल, मुरादाबाद आणि रामपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.