जगातील दोन महासत्ता देश अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरु आहे. शनिवारी अमेरिकेचे (United States) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक मोठा निर्णय घेत चीनमधून (China) आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क लागू करण्याची घोषणा केली होती. याचदरम्यान, आता चीननेही अमेरिकेला प्रत्युत्तर देत मंगळवारपासून म्हणजेच आजपासून अमेरिकन उत्पादनांवर नवीन शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे.
अमेरिकन उत्पादनांवर चीनने लादलेले शुल्क सोमवारपासून म्हणजेच 10 फेब्रुवारी पासून लागू होणार आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेने घेतलेल्या निर्णयाला प्रत्युत्तर म्हणून हा नवीन दर जाहीर केला आहे.
चीनच्या अर्थ मंत्रालयाने मंगळवारी अमेरिकन उत्पादनांवर 10 ते 15 टक्के शुल्क लावण्याच्या निर्णयाची माहिती दिली आहे. चीनने लावलेल्या नव्या दरांनुसार अमेरिकेतून चीनमध्ये येणाऱ्या कार, पिकअप ट्रक, कच्चे तेल, एलएनजी आणि कृषी उपकरणांच्या आयातीवर मोठा परिणाम होणार आहे.
चीनने अमेरिकेतून आयात होणारा कोळसा, एलएनजी (लिक्विफाइड नॅचरल गॅस) वर 15 टक्के आणि कच्चे तेल, कृषी उपकरणे, पिकअप ट्रक, उच्च उत्सर्जन वाहनांवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. याशिवाय अमेरिकेत निर्यात होणाऱ्या काही प्रमुख खनिजांवरही चीनने नियंत्रण आणले आहे. ज्याचा फटका आता अमेरिकेला बसला आहे.
गुगलबाबतही घेतला मोठा निर्णय!
पीटीआयच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकन दिग्गज टेक कपंनी गुगलवर देखील कडक निर्बंध लावले आहेत. गुगलने अँटीट्रस्ट कायद्याचे उल्लंघन केल्याच्या संशयावरून चीन आता गुगलची चौकशी करणार आहे.