Nitin Gadkari : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच टोलबाबत मोठी घोषणा केली आहे. एकसमान टोल धोरणावर काम सुरु असून यावर लवकरच घोषणा केली जाईल असं त्यांनी म्हणत आहे.
सोमवारी गडकरी यांनी सांगितले आहे की, राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे. आता भारतातील महामार्ग पायाभूत सुविधा अमेरिकेच्या बरोबरीची आहे. तसंच “आम्ही एकसमान टोल धोरणावर काम करत आहोत,” अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत गडकरी म्हणाले आहेत की, ‘रस्ते वाहतूक मंत्रालय एकसमान टोल धोरणावर काम करत आहे, जेणेकरून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळू शकेल. हे धोरण लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात एकच प्रकारचा टोल असेल, ज्यामुळे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील आणि टोल आकारणीत भेदभाव होणार नाही.’
नितीन गडकरी यांनी असेही सांगितले आहे की, मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर एक निर्बाध ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम (GNSS) आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सोशल मीडियावरील प्रवाशांच्या तक्रारी अतिशय गांभीर्याने घेत आहे आणि संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत आहे.’ तसंच या नवीन टोल प्रणालीमुळे, टोल टॅक्सची वसुली जलद आणि पारदर्शक पद्धतीने केली जाईल, ज्यामुळे प्रवाशांची टोलनाक्यांवरील लांबलचक रांगांपासून सुटका होईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे असंही म्हणाले आहेत की, ‘जास्त टोल आकारणे आणि खराब रस्ते यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये असंतोष वाढला आहे. आणि म्हणूनच प्रवाशांच्या तक्रारी मंत्रालय गांभीर्याने घेत असून कंत्राटदारांवर कडक कारवाई केली जात आहे.’
पुढे त्यांनी देशातील रस्त्यांच्या कामाबद्दल देखील माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, ‘संपूर्ण देशात रस्त्यांचे काम वेगात सुरु आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत सुमारे 7000 किलोमीटर महामार्ग बांधण्यात आला आहे. या आर्थिक वर्षात महामार्ग मंत्रालय 2020 – 21 या आर्थिक वर्षात दररोज 37 किमी महामार्ग बांधणीचा मागील विक्रम मागे टाकेल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.