पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जन्म वर्षानिमित्त चौंडी (जि.अहिल्यानगर) येथे राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी ९ फेब्रुवारीला सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत होणाऱ्या परिषदेला देशभरातील ४०० कर्तृत्ववान महिलांचा सहभाग असेल, अशी माहिती महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी दिली आहे .
नवी पेठेतील श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अहिल्यादेवी होळकर जन्म त्रिशताब्दी समारोह समितीचे प्रांत संयोजक महेशराव करपे यावेळी उपस्थित होते.
देव पुढे म्हणाले, २०२५ हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्म त्रिशताब्दीचे वर्ष आहे. आहे. या निमित्ताने, त्यांचे जन्मगाव चौंडी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन ‘लोकमाता अहिल्याबाई होलकर त्रिशताब्दी समारोह समिति’द्वारे करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (नवी दिल्ली) कुलपती डॉ. श्रीमती शांतिश्री पंडित यांच्या हस्ते होणार आहे. समारोप सत्रात ‘लोकमाता अहिल्याबाई होलकर त्रिशताब्दी समारोह समिती’च्या सचिव कॅप्टन श्रीमती मीरा दवे संबोधित करणार आहेत.महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था या कार्यक्रमाची सह-आयोजक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी महेशराव करपे हे पुढे माहिती देत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांना अभिवादन आणि राष्ट्रहितार्थ वैचारिक मंथन हे या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे. कार्यक्रमात अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी सुशासनावर चिन्मयी मुळे, धार्मिक कार्य व राष्ट्रीय दृष्टीकोन या विषयावर डॉ.मालती ठाकूर, अहिल्यादेवींच्या स्थापत्यशास्त्रावर डॉ. उज्वला चक्रदेव, सामाजिक सुधारणांवर डॉ. आदिती पासवान आणि महिला सबलीकरण या विषयवार नयना सहस्त्रबुद्धे यांचा परिसंवाद होणार आहे.
तसेच विविध विषयांवर यावेळी गटचर्चा, नृत्यनाटीका, अहिल्यादेवींच्या कार्याविषयी प्रदर्शनीचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले आहे. उपस्थितांमध्ये प्रशासकीय, धार्मिक, उद्योग, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्त्या अशा विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व करणाऱ्या महिलांचा सहभाग असणार आहे. या दिवसभराच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. त्यात देशभरातील मान्यवर महिलांचा सहभाग असणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन विविध भौगोलिक व सामाजिक क्षेत्रांत विधायक कामांची आखणी व उभारणी करणे, हा या उपक्रमाचा हेतू आहे.