‘सर्वोच्च पदाची प्रतिष्ठा कमी करण्याच्या उद्देशाने भारताच्या राष्ट्रपतींविरोधात अपमानास्पद शब्द वापरून’ संसदीय विशेषाधिकार, नैतिकता आणि औचित्य भंग केल्याबद्दल भाजप खासदारांनी काँग्रेस नेत्या आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना नोटीस बजावली आहे. यासोबतच भाजप खासदारांनी अपक्ष खासदार पप्पू यादव यांच्याविरोधातही विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली आहे.
भाजप खासदारांनी सादर केलेल्या नोटिशीमध्ये म्हंटल आहे की, ‘सोनिया गांधी यांनी अलीकडे केलेल्या काही अपमानास्पद टिप्पणीबद्दल आम्ही अत्यंत खेद व्यक्त करतो आणि निराशेने हे लिहित आहोत की, ‘सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींविरोधात केलेल्या वक्तव्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तसंच शिस्तभंगाची कारवाई करणं देखील आवश्यक आहे.’
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर टिप्पणी केल्याबद्दल सोनिया गांधी आणि पप्पू यादव यांच्या विरुद्ध संसदीय विशेषाधिकार भंगाची नोटीस सादर करणाऱ्या भाजप खासदारांवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले आहेत की, ‘देशातील आदिवासी खासदारांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतल आहे. त्यांनी आज लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांना आपले निवेदन सादर केले आहे. लोकसभेत पप्पू यादव यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला ‘प्रेमपत्र’ म्हटल आहे. यावर आमच्या आदिवासी खासदारांनी जोरदार आक्षेप नोंदवला आहे व सभापतींकडे याची तक्रार केली आहे.
पुढे रिजिजू म्हणाले आहेत की, ‘सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींचे वर्णन करताना ‘गरीब महिला’ असा शब्द वापरला आहे. राज्यसभेच्या अध्यक्षांनी देखील त्यांची ही टिप्पणी ऐकली असून त्यांनी ते गांभीर्याने घेतल आहे’.
सोनिया गांधी आणि पप्पू यादव यांनी काय विधानं केली?
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर काँग्रेस खासदार सोनिया गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, “राष्ट्रपती त्यांच्या भाषणात शेवटी थकलेल्या दिसत होत्या. तसंच सोनिया गांधींनी राष्ट्रपतींचे वर्णन गरीब महिला असा केला. त्याचवेळी अपक्ष खासदार आणि काँग्रेस नेते पप्पू यादव म्हणाले, ‘राष्ट्रपती हा फक्त एक शिक्का असतो, त्यांना फक्त प्रेमपत्रे वाचायची असतात.’ दोन्ही नेत्यांच्या याच वक्तव्यावर भाजपने आक्षेप घेत कारवाईच मागणी केली आहे.