आज सकाळी सात वाजल्या पासून दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज विधानसभेच्या एकूण 70 जागांसाठी मतदान होत आहे. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीतील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या X अकाऊंटवर पोस्ट शेअर करत दिल्लीतील जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे. “दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सर्व जागांसाठी आज मतदान होत आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन आपले बहुमोल मतदान करून आपला हक्क बजावा.’ तसंच पंतप्रधान मोदींनी सर्व तरुण बांधवांना मतदान करण्यासाठी विशेष शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
दिल्ली विधानसभा चुनाव में आज सभी सीटों के लिए वोट डाले जाएंगे। यहां के मतदाताओं से मेरा आग्रह है कि वे लोकतंत्र के इस उत्सव में पूरे उत्साह के साथ हिस्सा लें और अपना कीमती वोट जरूर डालें। इस अवसर पर पहली बार वोट देने जा रहे सभी युवा साथियों को मेरी विशेष शुभकामनाएं। याद रखना है-…
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2025
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दिल्लीतील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेला मतदानाचं आवाहन केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “मी दिल्ली विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाणाऱ्या बहिणी आणि भावांना खोटी आश्वासने, प्रदूषित यमुना, दारूची दुकाने, तुटलेले रस्ते आणि घाणेरडे पाणी यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन करतो.’ अमित शहांनी आपल्या पोस्टद्वारे अरविंद केजरीवाल यांना टोला लगावला आहे. कारण त्यांनी आपल्या निवडूक प्रचारादरम्यान दिल्लीतील जनतेला ही आश्वासनं दिली आहेत.
पुढे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘दिल्लीच्या विकासासाठी स्पष्ट दृष्टी असलेलं सरकार स्थापन करण्यासाठी आजच आपल्या सर्व शक्तीनिशी मतदान करा. तुमचे एक मत दिल्लीला जगातील सर्वात विकसित राजधानी बनवू शकते. आधी मतदान करा, मग नाश्ता करा.” असं देखील त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
दिल्ली निवडणुकीत 699 उमेदवार रिंगणात आहेत. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित रिंगणात आहेत. याशिवाय कालकाजीमधून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा लढत आहेत.