पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज प्रयागराजचा दौरा करणार आहेत. महाकुंभात सहभागी होत पंतप्रधान आधी संगमात स्नान करतील त्यानंतर गंगा मातेची पूजा करतील. याठिकाणी पंतप्रधान दोन तास उपस्थित असतील. याच पार्श्वभूमीवर आज याठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसंच मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी आज याभागात विशेष अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तसंच पंतप्रधानांच्या आगमनासाठी प्रयागराजमधील पाच सेक्टरमध्ये मॅजिस्ट्रेट तैनात करण्यात आले आहेत. यापूर्वी पंतप्रधान 13 डिसेंबर 2024 रोजी प्रयागराज इथं आले होते. या भेटीदरम्यान त्यांनी प्रयागराजला 5500 कोटी रुपयांचे 167 प्रकल्प भेट दिले आहेत.
महाकुंभात पंतप्रधान ज्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या भागांचा ताबा एनएसजीने घेतला आहे. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस, पीएसी आणि आरएएफचे जवान त्या भागात तैनात करण्यात आले आहेत. याचदरम्यान, गंगेच्या घाटांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. कारण पंप्रधानांच्या आगमनाने या ठिकाणी गर्दी होऊ शकते. हा प्रकार टाळण्यासाठी योग्य ती दक्षता आधीच घेण्यात आली आहे. पंतप्रधानांसोबत मुख्यमंत्री आदित्यनाथ आणि राज्य सरकारचे अनेक मंत्रीही उपस्थित असणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 2019 च्या कुंभमध्ये सहभागी झाले होते.
भारताच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा प्रचार आणि जतन करण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या अनुषंगाने पंतप्रधानांनी तीर्थक्षेत्रांच्या पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने सक्रिय पावले उचलली आहेत. अशातच आता पंतप्रधानांच्या या भेटीमुळे त्यांच्या मनात भारतीय संस्कृती आणि परंपरांबद्दल असलेला आदर दिसून येतो.