प्रवाह लॉ फोरम, गरवारे महाविद्यालयाचा पत्रकारिता विभाग आणि विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने माओवादाचे अभ्यासक, पत्रकार कार्तिक लोखंडे यांचे ‘शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा’ या विषयावर विशेष व्याख्यान पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील फिरोदिया सभागृहात दिनांक ०४ फेब्रुवारीला संपन्न झाले..
माओवाद काय आहे, माओवादी संघटना कशा काम करतात, त्यांना रोखण्यासाठी काय करण्यात आले, याबाबतचे कायदे कोणते आहेत, शहरी माओवाद आणि महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा काय आहे, याची सविस्तर माहिती कार्तिक लोखंडे यांनी दिली.
श्री कार्तिक लोखंडे यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे :-
-“देशाच्या सुरक्षेचे आपण देखील भागीदार आहोत, ही जाणीव निर्माण व्हावी.”
-“माओवाद आता केवळ ग्रामीण आणि आदिवासी भागापुरता मर्यादित राहिलेला नसून त्याचे शहरात देखील प्रमाण वाढत आहे. औद्योगिक क्षेत्र असलेल्या भागात माओवाद वाढत आहे. पायाभूत सुविधांपासूनच्या उणिवा, बौद्धिक व जातीयवाद करून समाजाला ज्या-ज्या भागात विभागता येईल, त्या त्या ठिकाणी विभागणी करण्याचे काम माओवादी करत आहेत. जहाल विचार पसरविण्यासाठी दलितांना लक्ष्य करण्यात येत आहे.
-माओवादी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतात मात्र राज्यघटनेला आणि राज्यघटनेचा उत्सव असलेल्या प्रजासत्ताकदिनाला विरोध करतात.
-देशातील सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत अनेक माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र त्यांना शिक्षा होत नसल्याचे प्रकार घडले आहेत, यामागची कारणमीमांसा लोखंडे यांनी मांडली. अनेकदा घटना घडल्यानंतर तेथील पुरावे प्रदूषित करण्यात येतात. आरोपीने गुन्हा केला आहे, हे सिद्धच होत नाही. कारण आरोपीचे खरे नाव आणि माओवादी संघटनेतील नाव हे भिन्न असतात. पुरावे पोलिसांनीच तयार केले आहेत, असे मांडले जाते. चुकीचे नरेटिव्ह सेट केले जाते. आरोपींना कायद्यातील त्रुटींचा फायदा होतो, त्यामुळे ते सुटतात.
-माओवादी चळवळीचा उगम कम्युनिस्ट चळवळीतून झाला. नंतरच्या काळात त्यास विविध ग्रुपमध्ये विभागले गेले. त्यामध्ये ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत त्यांची चळवळ सुरू राहिली. परंतु समाजातील विविध संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून मुंबईसारख्या शहरात माओवाद टिकून राहिला. त्यामुळे नक्षलवादाची सुरुवात ग्रामीण भागात झाली नसून, शहरी भागात झाली.
-नलक्षवादी समाजातील कामगार, मजूर, शेतकरी यांची माथी भडकिवण्यासाठी कार्यरत असतात. नक्षलवाद्यांकडून सरकार आणि लोकशाही विरोधात लढण्यासाठी एक प्रकारे जाळे निर्माण करण्यात आले आहे. सरकारच्या कारवायांमुळे माओवाद्यांचे सशस्त्र केडर कमी झाले आहे मात्र शहरी भागावर हे लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
-काही प्रमुख शहरात सुनियोजित पध्दतीने फोफावणारी नक्षलवादी गतिविधी यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी उपलब्ध कायदे अपुरे आहेत, त्यांची सीमा वाढवण्यासाठी प्रस्तावित जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आहे.
-आंध्रप्रदेश, तेलंगणा व उडीसा या नक्षलग्रस्त राज्यांनी नक्षलवादी व त्यांच्या फ्रंट संघटना यांचा बिमोड करण्यासाठी अशा प्रकारच्या कायदे राज्यात लागु केले आहेत. नक्षलवादाशी सामना करण्यासाठी त्यांचे चांगले परिणाम दिसुन आले आहेत.
-प्रस्तावित जनसुरक्षा कायद्यामुळे UAPA सारख्या कायद्यांमधे माओवाद्यांना शिक्षा करण्यात ज्या तांत्रिक अडचणी येतात त्या दूर करण्यासाठी जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता आहे.
यावेळी विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत आणि गरवारे महाविद्यालयाच्या पत्रकारिता विभागाच्या प्रा. ज्योती कपूर यावेळी मंचावर उपस्थित होत्या. विवेक सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. विजय दरेकर यांनी आभार मानले.