अमेरिकेकडून भारतीयांना परत पाठवण्याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांचे महत्वाचे व्यक्तव्य समोर आले आहे. अमेरिकेने 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना परत पाठवण्याबाबत जयशंकर यांनी गुरुवारी संसदेत याबाबत निवेदन सादर करत म्हंटल आहे की, “अशी कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वीही अशी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकेतून परत आलेल्या निर्वासितांशी गैरवर्तन होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही अमेरिकन सरकारशी संवाद साधत आहोत.” परदेशात बेकायदेशीरपणे राहत असल्याचे आढळून आल्यास आपल्या नागरिकांना मायदेशात परत घेणे ही देशाची जबाबदारी आहे, असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.
दुसरीकडे मात्र, अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या भारतीयांना मायदेशात परत पाठवण्याच्या पद्धतीवर विरोधी पक्षांच्या अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. बुधवारी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसरमध्ये दाखल झाले आहे. बेकायदेशीर स्थलांतरितांवरील कारवाईचा एक भाग म्हणून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने परत पाठवलेल्या निर्वासित भारतीयांची ही पहिली तुकडी आहे. यावेळी, निर्वासितांना पायात आणि हातात हातकडी घालण्यात आली होती. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर मात्र, एकच गोंधळ उडाला, निर्वासितांसोबत असं वर्तन का? असा सवाल विरोधकांकडून विचारण्यात आला.
काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह विरोधी खासदारांनी अमेरिकन अधिकाऱ्यांकडून भारतीयांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविरोधात संसद संकुलात निदर्शने केली.
ज्या पद्धतीने भारतीयांना परत पाठवण्यात आले, त्यातून सरकारची असहायता दिसून येते, असे म्हणत काँग्रेस नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. ज्या प्रकारे महिलांना गुन्हेगारांप्रमाणे वागणूक दिली गेली आणि त्यांना हातकडी घालून परत आणले गेले..आम्ही देशाचा अपमान सहन करणार नाही, असे म्हणत त्यांनी संसद संकुलात गोंधळ घातला.
ज्यावर जयशंकर यांनी राज्यसभेत स्पष्टीकरण देत म्हंटल,, “२०१२ पासून, अवैधपणे अमेरिकेत राहणाऱ्या नागरिकांना लष्करी विमानांद्वारे परत पाठवण्यात येत आहे. अशी कारवाई नवीन नाही. ही कारवाई करत असत्याना या नागरिकांच्या अन्न आणि इतर गरजा पूर्ण केल्या जातात. टॉयलेट ब्रेकच्या वेळी, गरज पडल्यास या नागरिकांना तात्पुरत्या बेड्याही घातल्या जातात.” असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.