इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर त्यांना एक विशेष गिफ्ट दिलं आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर नेतान्याहू यांनी त्यांना ही भेट दिली आहे.
नेतान्याहून यांनी ट्रम्प यांना ‘गोल्डन पेजर’ भेट म्हणून दिलं आहे. खरं तर ही भेटवस्तू लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध इस्राईलने केलेल्या कारवाईचे प्रतीक आहे. ज्यामध्ये हिजबुल्लाह संघटनेचे अनेक लोक मारले गेले होते.
लेबनॉनमध्ये काय घडले होते?
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, लेबनॉन आणि सीरियाच्या सीमावर्ती भागात पेजरचा मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता. हा स्फोट लेबनॉनची राजधानी बैरूत आणि दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात झाला होता. ही ठिकाणं हिजबुल्लाह संघनेटचा बालेकिल्ले मानली जातात. हिजबुल्लाहविरुद्धच्या या कारवाईत लेबनॉनमधील वॉकी-टॉकीज, सौर पॅनेल आणि हाताने चालणाऱ्या रेडिओतही हे स्फोट झाले होते. तसंच लेबनॉनमधील बैरूतसह अनेक शहरांमधील घरांच्या सौर यंत्रणेतही हे स्फोट झाले होते. हे सगळे साखळी स्फोट होते. म्हणजे याठिकाणी एकामागून एक स्फोट झाले होते.
मुख्य म्हणजे हिजबुल्लाहने संवादासाठी वापरलेल्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटांमध्ये 3,000 हून अधिक लोक जखमी झाले होते आणि सुमारे 40 जण ठार झाले होते. जखमींमध्ये हिजबुल्लाह संघटनेचे सैनिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
यानंतर नेतान्याहू यांनी लेबनॉन स्थित दहशतवादी गट हिज्बुल्लाहच्या ठिकाणांवर सप्टेंबरच्या पेजर हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. ज्यामध्ये सुमारे 40 हिजबुल्लाह संघटनेचे दहशतवादी मारले गेले होते.
हिजबुल्लाहच्या सैनिकांनी पेजरचा वापर का केला?
दहशदवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला केल्यापासून, हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेतृत्वाने आपल्या लढाऊ सैनिकांना संवादासाठी मोबाईल फोन किंवा इंटरनेटऐवजी पेजर वापरण्याचे आदेश दिले होते. यामागील कारण म्हणजे, इस्राईली सैन्य हिजबुल्लाह संघटनांच्या ठिकाणांचा सतत मागोवा घेत होते. आणि पेजरचे वैशिष्ट्य हे आहे की, कोणालाही पेजरचे स्थान ट्रॅक करता येत नाही. अशातच हिजबुल्लाहविरुद्धच्या कारवाईत एकाच वेळी लेबनॉन मध्ये पेजर स्फोट करण्यात आला यात हिजबुल्लाह संघटनेचे अनेक दहशदवादी मारले गेले. दरम्यान, आता ट्रम्प यांना ‘गोल्डन पेजर’ देत इस्राईलने हिजबुल्लाहच्या जखमेवर मीठ लावण्याचे काम केले आहे.