मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंग यांनी रविवारी राज्यपाल अजयकुमार भल्ला यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी मणिपूर विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधीच राजीनाम्यचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, नवीन सरकार स्थापन होईपर्यंत ते पदावर कायम असतील.
आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देत म्हंटले आहे की, ‘आतापर्यंत मणिपूरच्या लोकांची सेवा करायला मिळाली, यासाठी मी आभारी आहे. प्रत्येक मणिपुरीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळेवर कारवाई, हस्तक्षेप, विकास कामे आणि विविध प्रकल्पांची अंमलबजावणी केल्याबद्दल मी केंद्र सरकारचा देखील खूप आभारी आहे.’ असंही त्यांनी म्हंटल आहे.
मणिपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका होत होती. अशातच विरोधी पक्ष, एन. बीरेन सिंग सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करत होता. विधानसभा अधिवेशनाच्या संदर्भात सिंह यांनी शनिवारी भाजपाच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या आमदारांची बैठक घेतली होती. त्यांनंतर त्यांनी आपला हा निर्णय जाहीर केला. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले होते की, ते सिंग आणि त्यांच्या एन. बीरेन सिंग मंत्रिमंडळाविरूद्ध सोमवारी मणिपूर विधानसभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यास तयार आहेत.
तसंच त्यांच्या राजीनाम्यामागे आणखी एक कारण सांगितले जात आहे ते म्हणजे, त्यांना १२ आमदारांनी पाठिंबा दर्शवण्यास नकार दिला होता. त्याचबरोबर कॉनराड संगम यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने देखील आपला पाठिंबा काढून घेतला. अशास्थितीत त्यांच्यावर दवाब होता. सरकार संकटात येऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. एन. बिरेन सिंह यांनी पक्षाच्या केंद्रिय नेतृत्वाबरोबर चर्चा केल्यानंतरच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या बैठकीत राज्याच्या राजकीय स्थिती आणि संभाव्य पर्यायांवर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आता एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरचा पुढील चेहरा कोण असेल याची चर्चा होत आहे.