जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज प्रसिद्ध हभप शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून 5 फेब्रुवारी रोजी आपले जीवन संपवले. शिरीष महाराज मोरे यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोरे कुटुंबियांच्या मदतीला धावून आले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोरे कुटुंबियांना कर्ज फेडण्यासाठी 32 लाख रुपयांची मदत केली आहे.
शिरिष महाराज मोरे हे वारकरी संप्रदायातील एक मोठं नाव होते. ते किर्तनकार आणि प्रवचनकार देखील होते. प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती. शिरीष महाराज यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर कायम भाष्य केलं. ’लव्ह जिहाद’, ’उद्योग जिहाद’, ’लॅण्ड जिहाद’, ’फूड जिहाद’, यासह धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांनी परखड भाष्य केलं आहे. गोवंश हत्येच्या प्रश्नावर आपली भूमिका मांडत असताना त्यांनी म्हटलं होतं की हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा आहे. त्यामुळे तीचं रक्षण व्हावं यासाठी गाईंची होणारी तस्करी थांबवण्यात यावी. तसेच यासंदर्भात सरकारने कठोर कायदे करावेत अशी त्यांची भूमिका होती.
शिवव्याख्याते म्हणूनही शिरीष महाराजांचा पंचक्रोशीत मोठा लौकिक होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर व्याख्यान देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर प्रवास केला होता. यादरम्यान शिवरायांचा आणि शंभुराजांचा गौरवशाली इतिहास त्यांनी महाराष्ट्राभर पोहोचवण्याचं कार्य केलं. शिवराय समजून घेताना त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांवरचे पुस्तकही नुकतेच प्रकशित झाले होते. शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष, असलेले शिरीष महाराज हे काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक देखील होते. याशिवाय विश्व हिंदू परिषदेमध्येही ते सक्रिय होते.
आपल्या किर्तन, प्रवचनातून त्यांनी सामाजिक प्रबोधनाचेही कार्य केलं आहे. याशिवाय आध्यात्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपलं योगदान दिलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक तरुणांना त्यांनी हिंदूत्व चळवळीशी जोडण्याच काम केलं असल्याचं सांगितलं जातं. मागच्या वर्षी झालेल्या विशाळगड मुक्ती संग्रामात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावेळी महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी विशाळगड अतिक्रमणाविरोधात भर पावसात आंदोलन केलं होतं. त्यामध्ये शिरीष महाराज आघाडीवर होते. या लढ्यात संभाजीराजे छत्रपती हेही त्यांच्यासोबत होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विद्रुपीकरणा विरोधात त्यांनी शेकडो सभा घेऊन निर्भिड सत्यनिष्ठ भूमिका घेतली होती.