फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यासाठी पंतप्रधान मोदी रवाना झाले आहेत. फ्रान्स दौऱ्यावर पंतप्रधान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) अॅक्शन समिटच्या तिसऱ्या आवृत्तीचे सह-अध्यक्षपद भूषवणार आहेत. भारत आणि फ्रान्समधील संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा क्षण असल्याने, पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात एआय आणि अणुऊर्जा यासह प्रमुख विषयांवर चर्चा होईल.
त्यांनंतर पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जातील. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यासंबंधित पंतप्रधानांनी एक ट्विट देखील केले आहे.
पंतप्रधान मोदींनी पुढील काही दिवसांत विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी मी फ्रान्स आणि अमेरिकेत जाणार आहे असं ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले आहेत, ‘फ्रान्समध्ये मी ए. आय. कृती शिखर परिषदेत सहभागी होणार आहे, ज्याचे भारत सहअध्यक्ष आहे. भारत-फ्रान्स संबंध दृढ करण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा करणार आहे.’
पुढे त्यांनी असंही म्हंटल आहे की, “वॉशिंग्टन डी. सी. मध्ये मी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका यांच्यातली मैत्री दृढ होईल आणि विविध क्षेत्रांत प्रगती करण्यासाठी दोन्ही देश एकत्र येतील. पुढे त्यांनी म्हंटल आहे, ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्यासोबत काम केल्याचं मला आठवत. मला खात्री आहे की, आमचे संभाषण त्यावेळी झालेल्या चर्चेवर आधारित असेल.’
Over the next few days, I will be in France and USA to take part in various programmes.
In France, I will be taking part in the AI Action Summit, where India is the co-chair. I will be holding talks with President @EmmanuelMacron towards strengthening India-France relations. We…
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2025
कसा असेल कार्यक्रम?
दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारी (सोमवार) ते 12 फेब्रुवारी दरम्यान फ्रान्समध्ये असतील. दुसऱ्या दिवशी, 11 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासमवेत एआय कृती शिखर परिषदेचे सह-अध्यक्षपद भूषवतील. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही नेते मार्सेल शहराला भेट देतील आणि तेथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे उद्घाटन करतील. त्यांनंतर मोदी अमेरिकेला रवाना होतील आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतील. मोदींचा अमेरिका दौरा दोन दिवसांचा असेल.