अहिल्याबाईंच्या रूपाने चौंडीच्या भूमितच ३०० वर्षांपूर्वी बलिदान, न्याय आणि धर्माचा वटवृक्ष रूजला होता. ज्यांनी माळवा प्रांतात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साकारले होते.
अहिल्यादेवींचे लोककल्याणकारी राज्य म्हणजे धर्माधिष्ठीत सत्ताकारणाचा आदर्श होय, असे प्रतिपादन भारतीय सैन्याच्या कॅप्टन मीरा दवे यांनी केले.
चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन समारोहाच्या समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्र सेविका समितीच्या केंद्रिय कार्यकारिणी सदस्य भाग्यश्री साठे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सचिव डॉ. पी. व्ही. शास्त्री, आशाताई राम शिंदे उपस्थित होते.
मीरा दवे म्हणाल्या,”लोकमाता अहिल्यादेवींची दृष्टी ही राष्ट्रव्यापी होती. मातृशक्तीने घरापर्यंत मर्यादित नसावे. घरातून झालेले संस्कार समाज घडवतात आणि समाजातून राष्ट्र निर्माण होते. त्यामुळे अहिल्याबाईंच्या कर्तृत्वातील एक अंश आपल्यातही रूजायला हवा.”
तर तेजस्वी, धर्मनिष्ठ, न्यायप्रिय, लोकप्रशासक आणि सशक्त नेतृत्त्व असलेल्या अहिल्याबाईंना समाज जीवनात पोहोचवायला हवे असे आवाहन भाग्यश्री साठे यांनी केले. त्या म्हणाल्या, “आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात अहिल्याबाईंचे जीवनचरित्र पोहचवावे. त्यासाठी संशोधन, व्याख्याने, नाटक, नृत्य, अशा आयामांचा वापर करायला हवा. अहिल्यादेवींच्या नावाने संपूर्ण देशात विमर्श उभा राहायला हवा.”
सोहळ्याच्या उद्घाटन सत्रात विधानपरिषेदेचे सभापती व अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज राम शिंदे यांनी सांगितले की, “व्यक्तिगत आयुष्यात अनेक दुःखे असताना अहिल्यादेवींनी राष्ट्रनिर्माणाचे आणि लोकसेवेचे कार्य अविरत चालू ठेवले. सामाजिक न्याय, महिला कल्याण, व्यापार, कृषी आणि न्यायव्यवस्थेत त्यांनी केलेले कार्य आज आपल्यासाठी दिशादर्शक आहे. संपूर्ण राष्ट्रासाठी अहिल्यादेवी एक प्रेरणास्त्रोत आहे.”
तर आरोग्याच्या कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या दिल्लीस्थित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडित यांनी ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आपले मनोगत व्यक्त केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी ३०० वर्षांपूर्वी महिलाधारीत विकासकार्य केले. आज आत्मनिर्भर भारतासाठी अहिल्याबाईंचे लोकराज्य खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे, असे मत डॉ. पंडित यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुण्या म्हणून लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या सचिव कॅप्टन मीरा दवे, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री, सरपंच मालनताई शिंदे, माजी मंत्री आणि चौंडी विकास प्रकल्पाचे निर्माते अण्णासाहेब डांगे उपस्थित होते. या प्रसंगी राज्याच्या महिला व बालकल्याण, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, आमदार मोनिका राजळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात एकता मासिकाच्या अहिल्यादेवींवरील हिंदी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच चिन्मयी मुळे लिखित आणि देविदास देशपांडे अनुवादित ‘अदम्य चैतन्याची महाराणी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कलावर्धिनी नृत्य समूहाच्या अरुंधती पटवर्धन व त्यांच्या समूहाने अहिल्यादेवींचा जीवनपट उलगडून सांगणारी नृत्यनाटिका सादर केली.
प्रशासनातील लोककल्याणकारी वैविध्यता, समाजहितकारक सर्वसमावेशकता आणि देशभर धर्म व एकात्मतेसाठी आध्यात्माची गुंफण अशा मौलिक गोष्टींचा वारसा अहिल्यादेवींनी दिला आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने भारताच्या सांस्कृतिक एकात्मतेची पुनर्स्थापना केली, असा सूर चौंडी येथे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात उमटला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी अभिवादन कार्यक्रमात आयोजित परिसंवादात लोकमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समारोह समितीच्या सचिव डॉ. मालासिंह ठाकुर, नयना सहस्त्रबुद्धे, अभ्यासक डॉ. आदिती पासवान, लेखिका चिन्मयी मुळे उपस्थित होते. अहिल्याबाईंच्या लोककल्याणकारी राज्यावर प्रकाश टाकताना चिन्मयी मुळे म्हणाल्या,”अहिल्यादेवींनी न्याय, निष्पक्षता आणि समाजकल्याणाला सर्वाधिक स्थान दिले.त्यांचे शासन सर्व वर्गासाठीचे होते. त्यांनी महिलांचा सैन्यात समावेश केला. विधवांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला. राष्ट्रीयतेची वृत्ती समाजातील प्रत्येक घटकात उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.”
भारताच्या सांस्कृतिक एकतेची पुनर्स्थापना करण्याचे कार्य अहिल्याबाईंनी केले, असे मत डॉ. मालासिंह ठाकुर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “अखंड भारतातील धार्मिक स्थळांचे केवळ पुननिर्माण केले नाही. तर त्यांना स्वावलंबी करण्याचे कार्य लोकमातेने केले. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे एक उत्तम उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होय. समाजातील कर्मठ चालीरितींना त्यांनी धाडसाने मूठमाती दिली. एवढेच नव्हे तर त्यासोबत समरसतेचे कार्य देखील समाजाच्या सर्व घटकांपर्यंत कसे पाहोचेल असे त्यांनी पाहिले.”
डॉ. आदिती पासवान म्हणाल्या, “अहिल्याबाई केवळ प्रशासक नाही तर समाजसेवक होत्या. त्यांनी अनिष्ठ चालीरीतींना तिलांजली दिली.” प्रगल्भ दूरदृष्टी असलेल्या अहिल्याबाईंनी आर्थिक विकासाचे मोठे कार्य केले, असे प्रतिपादन नयना सहस्त्रबुद्धे यांनी केले. त्या म्हणाल्या, “सुशासनाचे वातावरण, कल्याणकारी कर आणि नितीपूर्ण संकलन ही अहिल्याबाईंच्या धर्मराज्याची वैशिष्ट्ये होते. उपभोग शुन्य राणी असलेल्या अहिल्याबाईंनी महिलांना केवळ अधिकार नाही तर कर्तव्याचीही जाणिव करून दिली. भारताला आर्थिक महासत्तेचे स्वप्न पाहायचे असेल तर महिलांच्या सहभागातून विकास साधायला हवा.”
माधुरी खांबेटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर स्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले. वंदे मातरम्ने सोहळ्याची सांगता झाली.
भारतभरातून आलेल्या सुमारे ५०० महिलांनी अहिल्यादेवींचा वाडा, जन्मस्थान, गढी आणि ऐतिहासिक मंदिराला भेट दिली. यावेळी सर्व महिलांचे प्रथेनुसार हळदी-कुंकू आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी रांगोळ्यांची सजावट आणि फुलांच्या पायघड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चौंडीतील स्वागतामुळे माहेरमेळ्याची अनुभूती आल्याची प्रतिक्रिया महिलांनी दिली. अहिल्यादेवींचा विचार समाजात सर्वदूर पोहचवू असा संकल्प त्यांनी यावेळी केला.