छत्तीसगडमधल्या बीजापूर जिल्ह्यात काल (दि.९) रोजी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये प्रथमदर्शी तरी तब्बल ३१ नक्षलींचा खात्मा झाला असल्याचे कळते आहे. बस्तरचे आयजी सुंदरराज यांनी याविषयी बोलताना सांगितले की, चकमकी दरम्यान चार जवानांना गंभीर जखमा झाल्या होत्या. त्यापैकी दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. इंद्रवती राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील जंगलात बीजापूर आणि नारायणपूरशी लगत असलेल्या महाराष्ट्र सीमेवर रविवारी सकाळी ही सगळी बाब घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजूनही परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
आयजीपी सुंदरराज यांनी पुढे सांगितले की ठार करण्यात आलेल्या नक्षलींची संख्या जास्तही असू शकते. चकमकीच्या ठिकाणाहून ऑटोमॅटिक हत्यारं आणि स्फोटकं जप्त केली गेली. छत्तीसगडमध्ये सुरक्षादल सातत्याने नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवत आहेत. डीआरजी बाजापूर, एसटीएफ तसेच सी-60 चे जवान परिसरात शोधमोहीम राबवत आहेत. त्यामुळे अजून बरच काही – काही हाती लागू शकतं.
या बीजापूरमध्येच गेल्या १ फेब्रुवारी २०२५ रोजी गंगालूर भागात पोलीस आणि नक्षलींमध्ये चकमक झाली होती. यामध्ये आठ नक्षली मारले गेले होते. मागील महिन्यात २०२० – २१ जानेवारी दरम्यान छत्तीसड आणि ओडिशाच्या सीमेवर गरियाबंद जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत १६ नक्षली मारले गेले होते. यामध्ये ९० लाखांचा इनाम असलेल्या चलपतीचा देखील समावेश होता. १ फेब्रुवारी २०२५ पर्यंत राज्यात झालेल्या विविध चकमकींमध्ये ५० पेक्षा जास्त नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. छत्तीसगड पोलिसांच्या मते राज्यात भाजप सरकार बनल्यापासून आतापर्यंत झालेल्या विविध चकमकीत जवानांनी आतापर्यंत तब्बल २०१९ नक्षलींना ठार केले आहे.
२०२३ साली नोव्हेंबरमध्ये छत्तीसगड राज्यात भाजपचे सरकार आले होते. तसेच मुख्यमंत्रीपदी विष्णूदेव सहाय बसले होते. त्यानंतर राज्यात नक्षलविरोधी मोहीमेस वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६ पर्यंत राज्याला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशातील रेड कॉरीडॉर समजल्या जाणाऱ्या भागात नक्सली आणि पोलीस तसेच विविध सुरक्षा बलांमध्ये चकमकी घडतं आहेत. त्यामुळे देशात लवकरच या चळवळीचा खात्मा होईल असं बोललं जातंय.