दिवसेंदिवस जीबीएस म्हणजेच गुइलेन बॅर सिंड्रोम आजाराचा संसर्ग वेगानं वाढत चालला आहे. या आजारामध्ये मृत्यूची संख्या देखील वाढत आहे. या आजराचा सर्वात जास्त धोका हा पुणे शहराला आहे. पुणे शहरात या आजाराचा आणखी एक बळी गेला आहे. पुण्यातील एका ३७ वर्षीय व्यक्तीचा कमला नेहरू रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोग्य विभागाकडून याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
फक्त पुण्यातच नाही तर राज्यात गुइलेन बॅर सिंड्रोम (GBS) आजाराच्या रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस भर पडत चालली आहे. आता राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या 192 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत राज्यात जीबीएसचा संसर्ग होऊन 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अशास्थितीत आता पुणे महानगरपालिकेकडून खबरदारी घेतली जात असून, जनजागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. या आजारासाठी महापालिकेनं एक वेगळा कक्ष देखील स्थापन केला असून, ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत. त्या भागात महानगरपाहिलेकडून टीम नियुक्त केली गेली आहे.
या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना आता आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून, आरोग्य विभागाकडून नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे. तसच हा आजार हलक्यात न घेण्याचे देखील आवाहन केलं जात आहे.
A man aged 37, diagnosed with rare neurological disorder Guillain-Barre Syndrome, dies in Pune; toll up to 7: Health officials
— Press Trust of India (@PTI_News) February 10, 2025
गुलेन बॅरी सिंड्रोम आजार काय आहे ? त्याचे धोके काय आहेत?
गुलेन बॅरी सिंड्रोम हा एक दुर्मिळ मज्जासंस्थेचा आजार आहे. या आजारात, रोगप्रतिकारक शक्ती मज्जासंस्थेवर हल्ला करते. या स्थितीचा परिणाम स्नायूंमधील कमकुवतपणा, पक्षाघात आणि गंभीर प्रकरणांमध्ये हा आजार जीवघेणा ठरू शकतो असं बोललं जात आहे. हा दुर्मिळ आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. अशास्थितीत गुलेन बॅरी सिंड्रोमची कारणे पूर्णपणे समजून घेणे वैद्यकीय शास्त्रासाठी अजूनही एक आव्हान आहे.
गुलेन बॅरी सिंड्रोमची लक्षण अगदी साधी आहेत, या आजारात ताप, हात-पाय सुन्न होणे, स्नायूंची कमज़ोरी , डोळ्यांमध्ये अडचण, बोलण्यात, चघळण्यात, किंवा गिळण्यात समस्या, सुई टोचल्यासारखी वेदना किंवा जळजळ, चालण्यात अस्थिरता, असामान्य हृदय गती किंवा रक्तदाब, पचन किंवा मूत्राशय नियंत्रणात समस्या, शरीरात तीव्र वेदना, ही लक्षण जाणवतात. ही लक्षण जरी साधी असली तरी याला हलक्यात घेण्याची चूक करू नका. जर तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असतील तर ताबडतोब रक्त तपासून वेळीच उपचार करा. अन्यथा साधा दिसणारा हा आजार तुमच्या जीवावर बेतू शकतो.
हा आजार अचानक पसरण्याचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. पण समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा आजार व्हायरल किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे किंवा वेगवगेळ्या लसीकरणानंतर किंवा कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेनंतर होऊ शकतो अशी कारण आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत. मात्र, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.
जर तुम्हालाही वरती दिल्याप्रमाणे लक्षणं दिसत असतील तर तुम्ही CSF द्रव चाचणी किंवा MRI करून त्याबद्दल जाणून घेऊ शकता. हा एक प्रकारचा स्वयंप्रतिकार रोग आहे. यावर मात करण्यासाठी रुग्णाने तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे अन्यथा यामध्ये जीव गमावण्याचा धोका आहे. आणि म्हणूनच नागरिकांनी वरील लक्षण दिसत असतील तर ताबडतोब त्यावर उपचार करणे गरजचे आहे. नागरिकांनी योग्य खबरदारी घेतल्यास आणि वेळेत उपचार घेतल्यास या आजारावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.