आजपासून राज्यभरात बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रारंभ होत असून, राज्यभरातून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत घेत याबद्दल माहिती दिली आहे. तसंच काही ठरावीक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी देखील देण्यात आली आहे. मात्र, कॅल्क्युलेटर, मोबाइल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी असे कोणतेही गैरवर्तन करू नये असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यंदा राज्यात १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देणार आहेत.
दरम्यान, परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय शासनाने परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी महत्त्वाचे पाऊल देखील उचलले आहे. कॉपीमुक्त परीक्षांसाठी सरकारने राज्यातील काही संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनचा (Drone) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.