जगभरातील राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. अनेक देशातील राष्ट्राध्यक्षांना आपला कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा द्यावा लागला आहे. काही देशात सत्तापालट करण्यात आली तर काही देशात विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे राजीनामा द्यावा लागला. आता अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा समोर येत आहे.
रोमानियन अध्यक्ष क्लॉस इओहानिस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्याच्या काही दिवसांनंतरच त्यांनी हा निर्णय घेतला आहे. रोमानियाला संकटातून वाचवण्यासाठी मी राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
क्लॉस इओहानिस हे 2014 पासून अध्यक्ष आहेत. त्यांनी दोनदा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. परंतु दुसऱ्या फेरीच्या मतदानाच्या दोन दिवस आधीच घटनात्मक न्यायालयाने राष्ट्रपतीपदाची निवडणूक रद्द केल्यानंतर डिसेंबरमध्ये त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला होता. रशियाने या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याचा आणि त्याचे उल्लंघन केल्याचा आरोप झाल्यानंतर निवडणूक रद्द करण्यात आल्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीदरम्यान रशियाच्या हल्ल्यांचे लक्ष्य रोमानिया बनले होते, असा आरोप देखील इओहानिस यांनी केला होता.
अलायन्स फॉर द युनिटी ऑफ रोमानियन्स (ए. यू. आर.) राष्ट्रवादी एस. ओ. एस. पक्ष आणि पार्टी ऑफ यंग पीपल, सेव्ह रोमानिया युनियन पक्षाच्या काही सदस्यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रस्तावाद्वारे इओहानिस यांना हटवण्याची मागणी केली होती.