या आठवड्यात फेसबुकची मूळ कंपनी मेटामधून अनेक कामगारांना नारळ दिला जाणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ‘आजपासून कर्मचाऱ्यांना यासंबंधित नोटीस पाठवण्यात आली आहे. कंपनी पुढील आठवड्यात 3,600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. मेटाच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेसह अनेक देशांवर परिणाम होणार आहे.
मुख्यतः जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँडमधील कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यात येणार आहेत. तसंच युरोप, आशिया आणि आफ्रिकेतसह इतर देशांतील कर्मचाऱ्यांना 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान यासंबंधित नोटीस बजावली जाणार आहे.
मेटाने यापूर्वी निवेदन सादर करत सांगितले होते की, ‘कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 5 टक्क्यांनी कमी करण्याची योजना आखत आहे. या छाटणीमध्ये कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार असल्याचं सांगितलं होत.
कंपनीने निवेदनात असेही म्हंटले आहे की, ‘कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांना कामावर ठेवण्याच्या प्रक्रियेला गती देणार आहे. जेणेकरून कंपनी 2025 च्या प्राधान्यांनुसार पुढे जाऊ शकेल.’ पुढे असेही म्हंटले आहे की, ‘ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात येणार आहे त्या कमर्चाऱ्यांना थेट नोटीस पाठवली जाईल.’
मेटा व्यतिरिक्त, इतर अनेक कंपन्यांमधूनही मोठ्या संख्येने कामगारांना काढून टाकण्यात येणार आहे. गुगल, मायक्रोसॉफ्टसह अनेक प्रसिद्ध कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ देण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, अॅमेझॉन सारख्या मोठ्या कंपनीने 200 कर्मचाऱ्यांना कामावरून कडून टाकले आहे.