उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून सुरु असलेल्या महाकुंभात आत्तापर्यंत 43 कोटी भाविकांनी पवित्र त्रिवेणी संगमामध्ये स्नान केलं आहे. महाकुंभ सोहळा 26 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार असून, आता महाकुंभ सोहळ्याला फक्त 1५ दिवस बाकी आहेत. अशातच जर तुम्ही महाकुंभाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर घाई करू नका.
कारण, महाकुंभाला जाणाऱ्या सर्व भाविकांना मोठ्या प्रमाणात ‘ट्रॅफिक जाम’चा सामना करावा लागेल. सध्या प्रयागराजकडं जाणाऱ्या रस्स्त्यांवर शेकडो किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम असल्याची माहिती आहे. अशास्थितीत राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहेत. जवळपास 300 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर वाहनं वाहतूक कोंडीमध्ये अडकली आहेत.
अशातच युपी सरकराने एक मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 फेब्रुवारीपासून कुंभमेळा परिसरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू करण्यात आला असून, बाहेरील वाहनांसाठी पार्किंगची जागा निश्चित करण्यात आलीय. 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून प्रयागराज शहरात ‘नो व्हेईकल झोन’ लागू केला जाणार आहे.
11 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रयागराजमध्ये वाहतूक निर्बंध लागू असतील. प्रवाशांच्या वाहनांवरही वाहतुकीचे निर्बंध असतील. माघ पौर्णिमेचे स्नान सुरळीत पार पडावे, यासाठी अधिकाऱ्यांनी जनतेला सहकार्य करण्याचे आवाहन केलंय. या नियमातून फक्त आपत्कालीन सेवांना सूट मिळेल.