जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या हज यात्रेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. हज यात्रेला जून २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक कठोर नियम जाहीर केले आहेत. याअंतर्गत आता सौदी अरेबियाने या वर्षी लहान मुलांना प्रवेशबंदी केली आहे.
सौदी अरेबियाच्या हज आणि उमराह मंत्रालयाने हज यात्रेबाबत अनेक नवीन नियम जाहीर केले आहेत. 2025 च्या हज यात्रेदरम्यान मुलांना यात्रेकरूंसोबत जाण्याची परवानगी नसेल. मुलांना सुरक्षित ठेवणे आणि गर्दीपासून त्यांचे संरक्षण करणे हा या निर्णयाचा उद्देश असल्याचे सौदी अरेबियाने सांगितले आहे. याशिवाय सौदी अरेबियाने पहिल्यांदाच हज ला जाणाऱ्या लोकांना काही प्राधान्य दिले आहे. यापूर्वी प्रवास केलेल्या हज यात्रेकरूंच्या तुलनेत प्रथमच प्रवास करणाऱ्या लोकांना काही प्राधान्ये देण्यात आली आहेत. हजच्या वेळी होणारी गर्दी कमी करण्यासाठी सौदी सरकारचा हा निर्णय आहे.
सौदी सरकारने म्हटले आहे की, नवीन नियमांचा उद्देश नवीन यात्रेकरूंसाठी हज यात्रा सुलभ करणे, पवित्र स्थळावरील गर्दी कमी करणे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे करणे हा आहे. याव्यतिरिक्त, हज आणि उमराह मंत्रालय यात्रेकरूंची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि हज यात्रेदरम्यान परिचालन उपाय सुलभ करण्यासाठी आहे.
इस्लाममध्ये हज यात्रा पवित्र मानली जाते आणि जे हज यात्रा करतात त्यांना हाजी म्हणतात. सौदी अरेबियातील मक्का हे मुस्लिमांसाठी सर्वात पवित्र शहर आहे. इथं दरवर्षी हज यात्रा आयोजित केली जाते. आर्थिकदृष्ट्या बळकट असलेल्या मुस्लिमांसाठी हज यात्रा अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येक मुसलमान व्यक्तीने आपल्या आयुष्यात किमान एकदा तरी हज यात्रेला जाणे आवश्यक आहे. हज ही सौदी अरेबियामधील मक्का या पवित्र शहरातील ‘अल्लाहचे घर’ असलेल्या काबाची तीर्थयात्रा आहे.