‘आज AI ही काळाची गरज आहे. आमच्याकडे जगातलं सर्वात मोठं टॅलेंट आहे. आम्ही लोकांचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. आमचं सरकार खासगी सेक्टर्सच्या मदतीने पुढे वाटचाल करतं आहे. AI चं भविष्य खूपच चांगलं आहे आणि AI मुळे सगळ्यांचं हित होणार आहे, अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आणि भविष्यातील AI च्या उपयोगाच्या बाबतीत भविष्य वर्तवत भाष्य केलं. प्रधानमंत्री मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
तसेच पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, AI आपल्या समाज, अर्थव्यवस्था आणि सुरक्षा या आघाड्यांना सकारात्मक पद्धतीने बदलतो आहे. AI बाबत काही जोखमीचे मुद्दे आहेत. त्यावर विचारमंथन झालं पाहिजे आणि चर्चा केला पाहिजे असंही मोदींनी सुचवलं आहे. AI कोड फॉर ह्युमॅनिटी लिहितो आहे. AI मुळे लाखो आयुष्यं बदलणार आहेत. काळ बदलतो आहे त्याचप्रमाणे रोजगारांचं स्वरुपही बदलतं आहे. AI मुळे रोजगाराचं संकट निर्माण होऊ शकतं. पण इतिहास आपल्याला हेच सांगतो की कुठलंही तंत्रज्ञान नोकऱ्या घेत नाही. AI मुळे नोकरीच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असही ते म्हणाले आहेत.
सोमवारी रात्री ते फ्रान्सची राजधानी पॅरीसला पोहचले. तिथे त्यांचं जोरदार स्वागत झालं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी AI समिटमध्ये भाषण केलं.
दरम्यान त्यांनी तिथल्या राजकीय नेत्यांशी द्वीपक्षीय चर्चाही केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्सिलो या ऐतिहासिक शहराचाही दौरा करणार आहेत.