अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. अशातच नुकताच आणखी एक निर्णय घेण्यात आला आहे. ट्रम्प यांनी परदेशी भ्रष्टाचार कायदा, 1977 रद्द केला आहे. ट्रम्प यांनी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी देखील केली आहे. सोमवारी रात्री हा आदेश सादर करण्यात आला आहे.
आता ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण अमेरिकेत बायडेन सरकाराच्या नेतृत्वाखाली त्यांच्यावर त्याच कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशात म्हंटले आहे की, ‘परदेशात व्यवसाय करण्यासाठी परदेशी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा खटला चालवू नये.’ अशा परिस्थितीत आता गौतम अदानी यांच्याविरोधात सुरु असलेला खटला आता पुढे चालवला जाणार नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही हा कायदा रद्द केला होता. “या कायद्यामुळे जग आमची खिल्ली उडवते. हा कायदा अमेरिकेन कंपन्यांना व्यवसायात विस्तार करण्यापासून रोखतो. स्पर्धेच्या या युगात अशा कायद्याचा काहीही उपयोग नाही.’ असं ट्रम्प यांनी म्हंटल आहे.
अदानी समूहाची चौकशी का केली जात होती?
न्यूयॉर्कच्या न्यायालयात अदानींविरुद्ध एक खटला (इन्डाइटमेंट) दाखल केला गेला होता. दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी, त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह आठ जणांना आरोप करण्यात आले होते की, भारतातील एक सोलर एनर्जी प्रकल्प मिळवण्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिली आहे.
अमेरिकेतील सिक्योरिटी एंड एक्सचेंज कमीशन (SEC) ने त्यांच्यावर हा आरोप लावला होता. पण प्रश्न असा होता की, हा प्रकल्प भारतातील आहे व लाच घेणारे अधिकारी व्यक्ती देखील भारतीय आहेत मग अमेरिकेत खटला का दाखल झाला? त्याचे कारण म्हणजे या प्रकल्पात अमेरिकन गुंतवणूकदारांची गुंतवणूक होती. त्यांच्यापासून ही माहिती लपवण्यात आली. त्यामुळे अमेरिकेच्या न्यायालयात त्यांच्याविरुद्ध खटला चालवण्यात आला.