इस्राईल आणि हमास यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढणार असल्याचं चित्र दिसत आहे. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या सैन्याला पुन्हा एकदा गाझा पट्टी व आसपासच्या भागात सैन्य तैनात करण्याचे आदेश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी गाझा पट्टीतून इस्राईली सैन्य माघार घेत परतत होते. मात्र, आता बेंजामिन नेतान्याहू यांनी दिलेल्या आदेशानुसार पुन्हा एकदा गाझा पट्टी व आसपासच्या भागात सैन्य तैनात करण्यात आलं आहे.
हमासने युद्धबंदी कराराचे उल्लंघन केलं असल्याचं सांगत बेंजामिन नेतान्याहू यांनी आपले सैन्य पुन्हा तैनात केले आहेत. तसेच हमासला धमकी देखील दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धबंदीचा करार झाला होता. या कराराअंतर्गत हमास २०० ओलीसांची सुटका करणार होते. बदल्यात इस्राईलकडून बंदिस्त पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करण्यात येणार होती. मात्र, आता हमास या कराराचं उल्लंघन करत असल्याचं नेतान्याहू यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
हमासकडून अनेक टप्प्यात इस्राईली बंधकांची सुटका केली जात आहे. त्या बदल्यात इस्राईल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत आहे. मात्र, करारानुसार हमासने शनिवारी बंधकांची सुटका केली नाही आणि तारीख पुढे ढकलली. हमासने बंदिस्त केलेल्या 200 पैकी आतापर्यंत 21 ओलीसांची बंधूंची सुटका केली आहे. मात्र, हमासने आता ओलीसांची सुटका थांबवली आहे.
अशातच आता पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला धमकी देतशनिवारी बंदकांची सुटका केली नाही तर प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेंजामिन नेतान्याहू यांनी यासंबंधित मंगळवारी त्यांच्या सुरक्षा मंत्रिमंडळाशी चार तास बैठक देखील घेतली.
सुमारे 15 महिन्यांच्या संघर्षानंतर इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धबंदीवर सहमती झाली आहे. सोमवारी हमासने सांगितले की, कराराअंतर्गत गाझा पट्टीला पुरेसा मदत पुरवठा केला जात नाही. या कारणास्तव, ते तीन बंधकांची सुटका पुढे ढकलत आहे. हमासच्या या कृतीमुळे आता गाझामधील युद्धविराम धोक्यात आला आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील हमासला धमकी दिली आहे. जर त्यांनी कराराचे पालन केले नाही तर त्यांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा देण्यात आला.