शरद पवार यांची गुगली राजकारणात अनेकांना कळत नाही. पण माझे आणि शरद पवार यांचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांनी मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढेही टाकणार नाहीत असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं आहे. सध्या दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतंय. या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार शिंदे यांना देण्यात आला. या कार्यक्रमामुळे एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमादरम्यान एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले.
तसेच उप मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ‘शरद पवार यांच्याकडून मला मिळालेला पुरस्कार हा वेगळा आहे. विचारधारा वेगळी असली तरीही वैयक्तिक संबंध हे प्रत्येकाने टिकवायचे असतात. राजकारणातही मी एक पातळी सोडून कधीही कुणावर टीका केली नाही. राजकारणात अनेक लोकांना माहीत आहे की माझ्यावर अनेक आरोप झाले आहेत. मी आरोपांना कामांतून उत्तर देत गेलो. हे संस्कार माझ्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे आहेत. अडीच वर्षांत मला चांगली कामगिरी करता आली. मी मुख्यमंत्री झालो तेव्हाच मला माहीत होतं की आपल्याकडे वेळ कमी आहे. कमी वेळात मराठी मातीसाठी जितकं शक्य तितकं करायचं असं मी ठरवलं होतं असंही शिंदे यावेळी म्हणाले.
सोबतच शरद पवार यांच्या सारख्या जाणत्या नेत्याच्या हस्ते मला हा पुरस्कार मिळाला. हे मी माझं भाग्य समजतो. महादजी शिंदे यांचं गाव सातारा जिल्ह्यातील कणेरखेड हे आहे. या लढवय्याच्या भूमित माझा जन्म झाला आहे. हे मी माझं भाग्य समजतो. पुरस्कार ज्यांच्या नावे आहे ते आहेत महापराक्रमी महादजी शिंदे, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे, पुरस्कार सोहळ्यात उपस्थित आहेत ज्योतिरादित्य शिंदे. ज्यांनी मला पुरस्कार दिला त्यांचं आडनाव पवार असलं तरीही देशाचे थोर क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे ते जावई आहेत. शेवटी शिंदे सगळे एकत्र आले. सदू शिंदे हे भारताचे गुगली बॉलर होते. त्यांची गुगली भल्याभल्यांना कळत नसे. शरद पवारांची गुगलीही अनेकांना कळत नाही. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांना गुगली टाकतात. त्यांनी आजवर मला गुगली टाकलेली नाही यापुढेही टाकणार नाहीत असा विश्वास आहे. असंही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, या कार्यक्रमावर मात्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राऊत म्हणाले की एका चुकीच्या व्यक्तीला पुरस्कार देऊन पवार साहेबांनी महाराष्ट्राची अस्मिता धुळीला मिळवली. आता राऊत यांच्या या वाक्यावरून वादंग होण्याची शक्यता आहे.