अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. त्यांनी लखनऊ येथील संजय गांधी या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य प्रदीप दास यांनी यासंबंधित माहिती देत सांगितले, ‘गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना लखनौच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’
सत्येंद्र दास हे 85 वर्षांचे होते त्यांना 3 फेब्रुवारी रोजी मेंदूतील रक्तस्त्रावानंतर लखनौ पीजीआयमध्ये आणण्यात आले होते. त्यांना रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते. सत्येंद्र दास यांना अनेक आरोग्य समस्या होत्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे गंभीर आजार त्यांना होते.
सत्येंद्र दास यांचे पार्थिव लखनौहून अयोध्येत आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 13 फेब्रुवारी रोजी सरयू नदीच्या काठावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
Acharya Satyendra Das, the chief priest of Ayodhya's Shri Ram Janmabhoomi temple, passed away at SGPGI Lucknow, today, confirms the hospital.
He was admitted to SGPGI on February 3 and was in the Neurology ward HDU after he suffered a stroke pic.twitter.com/vVmmjIIPoB
— ANI (@ANI) February 12, 2025
अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. योगींनी एक्सवर आपल्या भावना व्यक्त करत लिहिले आहे की, “महान रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी, आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. विनम्र श्रद्धांजली! मी प्रभू श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणकमलांमध्ये स्थान द्यावे आणि त्यांच्या शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी.”