दिल्लीत आप सरकार पडल्यानंतर सीबीआय कडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिल्ली परिवहन विभागाच्या सहा अधिकाऱ्यांना लाचखोरीच्या आरोपाखाली केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.
नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर दिल्लीतील ही पहिली मोठी कारवाई आहे. दिल्ली परिवहन विभागात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी सीबीआय कडे येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
अटक करण्यापूर्वी तक्रारींवर लक्ष ठेवण्याचा आणि त्यांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तक्रारींच्या पडताळणीदरम्यान, प्रथमदर्शनी दिल्ली परिवहन महामंडळामध्ये विविध स्तरांवर भ्रष्टाचाराचे संकेत मिळाले, ज्या विरोधात कारवाई करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
दिल्ली-गुरुग्राम सीमेवर लाच घेतल्याबद्दल दिल्ली सरकारच्या परिवहन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. तक्रारींचा तपास केल्यानंतर भ्रष्टाचाराचे पुरावे सापडले, ज्याच्या आधारे अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्लीत सत्तेवरून बाहेर पडताच आता आम आदमी पार्टीच्या अडचणी वाढत आहेत. पोलीस पथक पक्षाचे आमदार अमानतुल्ला खान यांचा शोध घेत आहेत. जामिया नगरमध्ये पोलिसांच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी सोमवारी आमदार अमानतुल्ला खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अमानतुल्ला खान यांनी हत्येच्या प्रयत्नात फरार असलेल्या आरोपीला पळून जाण्यास मदत केली. दिल्ली पोलिस जेव्हा जामिया नगरमध्ये तडीपार शबाझ खानला अटक करण्यास गेले तेव्हा आपचे आमदार अमानतुल्ला खान यांच्या समर्थकांमध्ये आणि पोलिसांमध्ये चकमक झाली यादरम्यान, शबाझ घटनास्थळावरून पळून गेला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी अमानतुल्ला खान घटनास्थळी उपस्थित होते, ज्यामुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला.