बांगलादेशचे अंतरिम सरकार डिसेंबर 2025 मध्ये बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका घेण्याची तयारी करत आहेत. बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर डिसेंबरमध्ये बांग्लादेशात नवीन सरकार स्थापन करण्यात येईल. सोमवारी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी यासंबंधित माहिती दिली आहे. अंतरिम सरकार डिसेंबरपर्यंत सार्वत्रिक निवडणुका घेईल असं आश्वासन अंतरिम सरकरकडून देण्यात आले आहे.
अंतरिम सरकारमधील अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘युनूस सरकार डिसेंबरपर्यंत निवडणुका घेण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोगाशी यासंबंधित चर्चा झाली असून, यावर एकमत झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. तसंच निवडणुका लवकरच घेतल्या जाऊ शकतात असंही त्यांनी सांगितलं आहे.
शेख हसीना यांचे सरकर हटवल्यानंतर 8 ऑगस्ट 2024 रोजी मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारची स्थापना करण्यात आली. मात्र, तरीही बांगलादेशात हिंसाचार थांबला नाही. अशातच त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली.
दरम्यान, कट्टरपंथी आणि अतिरेकी इस्लामी संघटनांना आश्रय दिल्याबद्दलही युनूस सरकारला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. गेल्या काही महिन्यांत बांगलादेशात घडलेल्या घटना लपवल्या गेल्या. देशात अल्पसंख्याकांच्या, विशेषतः हिंदूंच्या छळाच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यावर युनूस सरकराने कोणतेही भाष्य केले नाही. अशास्थितीत त्यांच्या नेतृत्वावर फक्त देशातूनच नाही जगभरातून टीका करण्यात आली.