भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या मैदानावर खेळताना रन मशीन विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध 4 हजार धावा करणारा विराट कोहली भारतातला पहिला फलंदाज ठरला आहे. तर जगातला सहाव्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या 87 व्या सामन्यात विराट कोहलीने हा विक्रम केला आहे. कोहलीने इंग्लंडविरुद्ध 8 शतके आणि 23 अर्धशतके झळकावली आहेत. या कालावधीत त्याची सरासरी 41.23 होती. ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमन हा इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. केवळ 37 कसोटीत 5028 धावा करून त्याने या यादीत अव्वल स्थान मिळवले आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध 4815 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.
इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा :-
डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)-63 डावांत 5028 धावा.
एलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया)-124 डावांत 4850 धावा.
स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)-114 डावांत 4815 धावा.
विव रिचर्ड्स (वेस्ट इंडिज)-84 डावांत 4488.
रिकी पॉन्टिंग (ऑस्ट्रेलिया)-99 डावांत 4141 धावा.
विराट कोहली (भारत)-109 डावांत 4001 *
कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरने इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 3990 धावा केल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीचे नाव आहे. ज्याने 2999 धावा केल्या आहेत. राहूल द्रविडच्या नावावर 2993 धावा आहेत. तर गावस्करच्या नावावर 2919 आणि रोहित शर्माच्या नावावर 2460 धावा केल्या आहेत.