1984 साली दिल्लीत झालेल्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सज्जन कुमार यांच्या शिक्षेवर आता 18 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राऊज अव्हेन्यू न्यायालयाने सज्जन कुमार यांना या प्रकरणात दोषी ठरवले आहे. या खटल्याचा निकाल तब्बल ४१ वर्षांनंतर आला आहे.
१९८४ च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान सरस्वती विहारमध्ये दोन शिखांच्या हत्येचा हा खटला आहे. सज्जन कुमार हे सध्या तिहार तुरुंगात आहे. त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होत.
पंजाबी बाग पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले होते. 16 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने कुमार यांच्याविरोधात आरोप सिद्ध झाले होते.
सज्जन कुमार यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शीखविरोधी आंदोलन केले होते. या आंदोलनात त्यांनी मोठ्या प्रमाणात लूटमार, जाळपोळ आणि शीख मालमत्तेची नासधूस केली होती. या आंदोलनावेळी त्यांनी एका शीख घरात घुसून जसवंत आणि त्याच्या मुलाची हत्या केली होती. तसंच त्यांच्या सामानाची लूट केली व त्यांच्या घराला आग लावली. अशी फिर्याद त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आली होती. सज्जन कुमार हे या आंदोलनात केवळ सहभागीच नव्हते तर त्यांनी या आंदोलनाचे नेतृत्वही केले होते. यासंबंधित सगळे पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यांच्याविरोधी सगळे पुरावे मिळाल्यानंतर व त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर आता त्यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
सज्जन कुमार यांच्या विरुद्ध दंगल, खून आणि दरोडा या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम १४७, १४९, १४८, ३०२, ३०८, ३२३, ३९५, ३९७, ४२७, ४३६, ४४० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.