नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च करण्यात आले होते. या ऑपरेशन टायगरचा आता रिझल्ट यायला लागले आहेत असं आपण म्हणून शकतो कारण उध्दव ठाकरे यांचे निष्ठावान आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नुकताच ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करतं कायमचा राम – राम करून शिंदे गटात प्रवेश केला आहे.
फक्त ठाकरे गटाचे आमदार राजन साळवीच नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्ह्याध्यक्षा वंदना पाटील यांनी देखील आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिंदे गटातील बडे नेतेही उपस्थित होते.
महापालिका निवडणुकांच्या आधी तिन्ही पक्षांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. खरं तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. व महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. यानंतर अनेक नेत्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीची चिंता लागून राहिली आहे. अशास्थितीत काही नेत्यांमध्ये पक्षांतराविषयीची चलबिचल सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील अनेक नेते मंडळी महायुतीच्या दिशेने पाऊल ठेवत असलयाचे दिसून येत आहे.