ज्यांच्या आजोबांना देशातले अनेक नेते थेट ‘मातोश्री’वर भेटायला यायचे, आज त्यांचाच नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय. मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..? तसेच केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर दररोज टीका करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का..! अशा शब्दात भाजप आमदार आणि नेत्या चित्रा वाघ यांनी हल्ला चढवला आहे. तसेच आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..?. आजोबांचे तरी स्मरण ठेवा, असे देखील चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. वाघ यांनी नुकतीच एक एक्सपोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि वरळी विधानसभा मतदार संघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आप प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.
या भेटीनंतर आदित्य यांनी पत्रकारांशी संवाद देखील साधला. सरकारे येतील – जातील. पण संबंध राहिले पाहिजेत. तसेच पुढचा विचारही केला पाहिजे. यासाठी राहुल गांधी आणि केजरीवालांची भेट घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.
आदित्य ठाकरेंच्या या भेटीवरून सत्ताधारी नेत्यांकडून टीका केली जात आहे. दिल्लीपुढे न झुकणारे आता दिल्लीत राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, असा टोला भाजपा महिला नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी लगावला आहे. तसेच बाळासाहेबांना भेटायला जे ‘मातोश्री’वर जायचे त्यांचे नातू म्हणजेच आदित्य ठाकरे हे दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करत आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरेंच्या भेटीवर संजय राऊतांच्या मौनावारही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.