देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान अमेरिकेत पोहचल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. दोनी नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ कसे होतील या वर देखील चर्चा झाली.
यावेळी अमेरिका दहशतवादाविरोधातील लढाईत खंबीरपणे उभं आसायचं दिसून आलं. काल ट्रम्प यांनी 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला भारताकडे लवकरच सोपवणार असल्याची घोषणा केली.
यासंबंधित ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. यावेळी ट्रम्प म्हणाले, ‘मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, माझ्या प्रशासनाने दहशदवादी तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. लवकरच त्याला भारताकडे प्रत्यार्पण केलं जाणार आहे.’ तहव्वूर राणावर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप आहे.
मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार राणा याच्या विरोधात भारताने अमेरिकेन एजन्सीला माहिती दिली होती. भारताने त्याच्या विरोधातील पुरावे आधी कनिष्ठ न्यायालयात पाठवले आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आले. न्यायालयाने भारताचे पुरावे स्वीकारले आणि राणाला दोषी ठरवले. भारताने दिलेल्या पुराव्यात मुबंईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात तहव्वूर राणाचा सहभाग असल्याचे नमूद आहे. त्यानंतर भारताने तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती.
दरम्यान, ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचे आभार मानले आहे. याविषयी बोलताना मोदी म्हणाले आहेत की, ‘दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका एकत्र उभे राहतील. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी ठोस कारवाई आवश्यक आहे. आणि दोन्ही देश याला समर्थन देतात. 2008 मध्ये भारतात नरसंहार घडवणाऱ्या गुन्हेगाराला भारताच्या हवाली करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी राष्ट्रपतींचे आभार मानतो. भारतातील न्यायालय त्याच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करतील.’