भारतीय रिझर्व्ह बँकने एका खाजगी बँकेवर कारवाई करत काही प्रमाणात निर्बंध लावले आहेत. यामुळे आता खातेधारकांमध्ये चिंता वाढली असून, खातेधारकांनी सकाळपासून बँकेबाहेर पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत. आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई केली आहे.
आरबीआयने मुंबईतील खाजगी बँक न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी घातली आहे. आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेल्या या निर्बंधामुळे ग्राहक यापुढे या बँकेत त्यांचे कोणतेही काम करू शकणार नाहीत. अशातच आता ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
13 फेब्रुवारी 2025 रोजी आरबीआयने न्यू इंडिया सहकारी बँकेच्या कामकाजावर अनेक निर्बंध लादले आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या अनियमिततेमुळे आरबीआयने ही कारवाई केली आहे. अशापरिस्थितीत आता न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे ग्राहक कोणतेही पैसे बँकेत जमा करू शकणार नाहीत किंवा बँकेतून पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयने केलेल्या या कारवाईमुळे आता बँकेच्या ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
आरबीआयने म्हटले आहे की, ‘बँकेची सध्याची स्थिती लक्षात घेता, असे निर्देश दिले जात आहे की, बँक बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढू शकत नाही.’ आरबीआयकडून बँकेला कर्मचाऱ्यांचे वेतन, भाडे आणि विजेची बिले यासारख्या काही आवश्यक वस्तूंवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
शिवाय आरबीआयच्या पूर्वपरवानगीशिवाय बँक कोणतेही कर्ज किंवा आगाऊ रक्कम देऊ शकणार नाही. तसंच बँकेला कोणत्याही प्रकराची गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जाणार नाही. आरबीआयने पुढे म्हटले आहे की, ‘ठेवीदार या बँकेतून फक्त 5 लाख रुपये काढू शकतात. याशिवाय ग्राहकांना लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तू बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.’