महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुका पार पडण्यापूर्वी पहिले ते पदवी पर्यंतच्या मुलींच्या फी माफीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सगळ्या महाविद्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. पण बऱ्याच ठिकाणी त्यावर कार्यवाही होताना दिसत नाही. यामुळें राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर आले आहेत. ते १०० महाविद्यालयांना अचानक भेट देणार आहेत. त्यातला पहिला टप्पा म्हणून त्यांनी पुण्यातील गरवारे महाविद्यालयाला भेट देत आढावा घेतला आहे.
उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे; यासाठी राज्य सरकारने व्यवसायिक आणि वैद्यकीय शिक्षणाचे शूल्क माफ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी एकूण ८४२ कोर्सेसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात दोन हजार कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती. सदर निर्णयाच्या अंमलबजावणीतील शैक्षणिक संस्थांसमोरील अडचणी दूर करण्यासाठी शासनाने दिशानिर्देश देखील जारी केले होते.
तसेच उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून भरारी पथक नेमून विद्यार्थिनींच्या तक्रारींची दखल घेतली जात होती. दर निर्णयाचा आतापर्यंत किती विद्यार्थिनींना लाभ झाला, याचा प्रत्यक्ष आढावा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील घेण्यास सुरुवात केली असून, आज त्यांनी गरवारे महाविद्यालयास अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी थेट महाविद्यालयामधील विद्यार्थिनींशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की उच्च शिक्षणाचा खर्च परवडत नसल्याने अनेक मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. त्यामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविण्यासाठी शासनाने मुलींचे व्यावसायिक आणि वैद्यकीय शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला. सदर निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशा प्रकारे होत आहे, याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.तसेच प्रत्येक महाविद्यालयातील मुलींनी ३१ मार्चपर्यंत महाविद्यालयात शासनाने नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून फी माफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. जेणेकरून मुलींना या निर्णयाचा लाभ घेता येईल. तसेच, विद्यार्थिनींच्या अडचणी समजून घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना यावेळी केली.
दरम्यान, राज्यभरातील शंभर महाविद्यालयांना अशा प्रकारे अचानक भेट देऊन मुलींच्या फी माफीचा आढावा घेणार असून, मुंबईतील वांद्रे येथील थडोमल शहानी महाविद्यालयातून सुरुवात केली असून पुण्यातील गरवारे दुसरे महाविद्यालय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ‘कमवा आणि शिका’ तत्वावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा भत्ता वाढविण्याची मागणी काही विद्यार्थ्यांनी यावेळी केली असता त्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही देखील यावेळी त्यांनी दिली.तसेच यापुढे काहीही झालं तर चंद्रकांत पाटील विद्यार्थ्यांसाठी कायम उपलब्ध असतील असही ते म्हणाले.