भारतीय रिझर्व्ह बँकने १३ फेब्रुवारीला एका खाजगी बँकेवर कारवाई करत बंदी घातली आहे. यामुळे खातेधारकांमध्ये मोठ्या प्रमाणात चिंता वाढली आहे. आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल ही कारवाई केली आहे.
आरबीआयने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादलेल्या या निर्बंधामुळे ग्राहक यापुढे या बँकेत कोणतेही काम करू शकणार नाहीत. यामुळे आता ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे.
अशातच आता या बँकेबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश प्रवीणचंद मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. हितेश बँकेचा महाव्यवस्थापक असताना आणि दादर, गोरेगाव शाखेचा प्रभारी असताना हा घोटाळा झाला होता. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दोन्ही शाखांच्या खात्यातून 122 कोटी रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे. आणि म्हणूनच आरबीआय कडून ही कारवाई करण्यात आली आहे.
बँकेच्या मुख्य लेखा अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत म्हटले आहे की, ‘हा घोटाळा 2020 ते 2025 दरम्यान झाला. हितेश व्यतिरिक्त आणखी एका व्यक्तीचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील तपासासाठी हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.
दादर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या आयपीसी कलम 316 उपकलम 5 व कलम 61 उपकलम 2 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणाचा आता तपास सुरू झाला असून, लवकरच या घोटाळ्यात कोणाचा हात होता? कोण-कोण सहभागी होते यासंबंधित माहिती मिळेल. तसेच, नियम आणि सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्यात बँकेने काही निष्काळजीपणा केला आहे हे देखील या तपासात समोर येईल.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ही ५७ वर्षे जुनी आहे. १९६८ मध्ये स्थापन होऊन १९७७ मध्ये नामांतर झालेल्या या बँकेत आज सर्वसामान्यांचे २,४६६.३७ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून रोष व्यक्त होत आहे. तसेच आपल्या पैशांबाबत चिंतेचे वातावरण आहे.