क्रिप्टोकरन्सी घोटाळाप्रकरणी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणामध्ये 11 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. सीबीआयने या कारवाई अंतर्गत रोख रक्कम, अमेरिकन डॉलर्स आणि सोन्यासह इतर वस्तू जप्त केल्या आहेत. दोन वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्ली आणि हरियाणामध्ये दोन वर्षापूर्वी 11 ठिकाणी छापे टाकून कथित सायबर गुन्हेगारांना सरकारी अधिकारी असल्याचे भासवून 1.08 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
याच प्रकरणी कारवाई करत दिल्लीतील नऊ ठिकाणी आणि हरियाणातील हिसारमध्ये दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईवर सीबीआय प्रवक्त्याने सांगितले की, ‘आरोपींवर सरकारी अधिकारी असल्याचे भासवून बेकायदेशीर कारवाया आणि क्रिप्टो फसवणूक केल्याचा आरोप आहे.’
सीबीआयने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकांना बनावट अधिकारी बनून गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना क्रिप्टोकरन्सीच्या स्वरूपात पैसे गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून ही फसवणूक करण्यात आली. हे पैसे नंतर अनेक क्रिप्टो वॉलेटमधून काढून त्याचे रोख रकमेत रूपांतरित केले गेले. एजन्सीने यापूर्वीच या प्रकरणातील तीन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आता याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.’
छाप्यांमध्ये सीबीआयने सहा लॅपटॉप, आठ मोबाईल फोन आणि एक आयपॅड जप्त केला आहे. या छाप्यात 1.08 कोटी रुपये रोख, 1,000 डॉलरचे विदेशी चलन आणि 252 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.