पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या केसरी टूर्स कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष केसरीभाऊ पाटील यांचे आज पहाटे निधन झाल आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने पर्यटन उद्योगात शोककळा पसरली आहे. 1984 पासून सुरु असलेली ही कंपनी मध्यमवर्गीयांचे परदेश फिरण्याचे स्वप्न पूर्ण करत आहे. गेल्या ४१ वर्षांत केसरी टुर्सने फक्त देशातच नाही तर जगभरात नाव कमावले आहे.
केसरीभाऊ पाटील यांच्यावर आज वांद्रे येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी संध्याकाळी 4 ते 6 या वेळेत बांद्रा येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
आज ‘केसरी टूर्स’च्या फक्त राज्यातच नाही तर देशभर शाखा आहेत. केसरी टूर्सच्या माध्यमातून राज्यांतर्गत, देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय सहलींचे आयोजन केले जाते. अगदी सर्व सामान्यांना परवडेल अशा सहली केसरी टूर्स कडून आयोजित केल्या जातात.
पर्यटन क्षेत्रातील योगदानासाठी केसरीभाऊ पाटील यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांना पर्यटन क्षेत्रातील चालते – बोलते विद्यापीठ म्हणून संबोधले जायचे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देखील केसरीभाऊ पाटील यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. पर्यटन क्षेत्रातील संधीची ओळख करून देणारा, महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा उद्यमी म्हणून उद्यमशील केसरीभाऊ पाटील यांचे नाव सदैव स्मरणात राहील, उद्योग-व्यवसायाच्या एखाद्या नव्या क्षेत्रात उतरून, त्यामध्ये नाव कमावून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची क्षमता केसरीभाऊ पाटील यांनी आपल्या अंगी असलेल्या व्यवस्थापन आणि उद्मोजकतेच्या कौशल्याच्या जोरावर सिद्ध केली. त्यांच्या निधनामुळे एका धडाडीच्या, उद्यमशील अशा व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. केसरीभाऊ यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना. असे फडणवीसांनी शोकसंदेशात म्हटले आहे.