पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने सोमवारी 17 फेब्रुवारी नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) निवडण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता.
या बैठकीत केरळ कॅडरचे माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) राजीव कुमार आज (18 फेब्रुवारी) निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर वरिष्ठ निवडणूक म्हणून ज्ञानेश कुमार सर्व सूत्रे हाती घेतील. त्यांना मुख्य निवडणूक आयुक्त बनवण्याची चर्चा आधीपासूनच सुरु होती. आता त्यांच्या नावावर अधिकृतपणे शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.
कोण आहेत ज्ञानेश कुमार?
ज्ञानेश कुमार हे 1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते 31 जानेवारी 2024 रोजी निवृत्त झाले आहेत. ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. त्यांनी संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव म्हणून काम केले आहे. त्यांनी सहकार मंत्रालयात सचिव म्हणूनही काम केले आहे. तसेच ज्ञानेश कुमार यांनी गृह मंत्रालयात असताना राम जन्मभूमी तीर्थ ट्रस्टच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. व जेव्हा कलम 370 रद्द करण्यात आले, तेव्हा ते गृह मंत्रालयात जम्मू आणि काश्मीर डेस्कचे प्रभारी होते.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीबाबत आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायलयात चालू असलेल्या निवड प्रक्रिया कायद्यासंदर्भात सुनावणीचा हवाला देत असहमत असल्याचे म्हटले आहे.
निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधीपक्ष नेते, सरन्यायाधीश या तीन सदस्यांच्या समितीद्वारे होते. मात्र, या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नसल्याने हा वादाचा मुद्दा बनला. सरन्यायाधीशांचा निवड प्रक्रियेमध्ये समावेश नसल्याने समिती कमकुवत झाली आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तसेच, या प्रकरणाची सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे. मात्र, सुनावणीआधीच ही नियुक्ती करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.