Sheikh Hasina : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेख हसीना यांना देशात झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देश सोडावा लागला होता. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशमध्ये सध्या मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार कार्यरत आहेत.
दरम्यान, देश सोडल्यानंतरही शेख हसीना या वेळोवेळी ऑनलाइन माध्यमातून आपला पक्ष आवामी लीगच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अशातच आता त्यांनी युनूस यांच्या सरकारला ‘दहशतवादी’ म्हणत देशात झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असं म्हंटल आहे.
बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना यांनी अवामी लीग पक्षाच्या समर्थकांना आणि निदर्शनांमध्ये ठार झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांना ऑनलाईन संबोधित करताना बांगलादेशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचा निषेध करत नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांनी देशाचे दहशतवादी राष्ट्रात रूपांतर केले असल्याचे म्हंटल आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यावेळी म्हणाल्या, “मी तुम्हा सर्वांना धैर्य बाळगण्याचे आणि एकजूट राहण्याचे आवाहन करते. मी परत येईन आणि आपल्या पोलिसांच्या हत्येचा बदला घेईन. मी पूर्वीप्रमाणेच न्याय देईन. तुम्हाला माझा शब्द आहे. असे आश्वासन त्यांनी यावेळी आवामी लीगच्या कार्यकर्त्यांना दिले आहे.
पुढे हसीना म्हणाल्या, “युनूस यांना सरकार चालवण्याचा कोणताही अनुभव नाही. त्यांनी सर्व तपास समित्या बरखास्त केल्या आणि लोकांना ठार मारण्यासाठी दहशतवाद्यांना सोडले. ते बांगलादेश उद्ध्वस्त करत आहेत. दहशतवाद्यांचे हे सरकार आम्ही उलथून टाकू. देवाने मला नवीन जीवन दिले आहे. त्याचा काहीतरी हेतू असेल असे मला वाटते. त्यांनी यापूर्वीही मला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि 5 ऑगस्टला देखील त्यांनी मला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना असं करण्यात यश आले नाही. देव आपल्या सर्वांसोबत आहे.
शेख हसीना म्हणाल्या की, ‘सहा महिने उलटून गेले आहेत आणि देशात अजूनही हिंसाचार सुरूच आहे. आता मी ऐकले आहे की देशात ऑपरेशन डेव्हिल हंट सुरू करणार आहेत. ते देश चालवू शकत नाहीत. अर्थव्यवस्था संकटात आहे. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आहे. असं हसीना यांनी अवामी लीगच्या समर्थकांना संबोधित करताना म्हंटल आहे.